शेतकऱ्यांसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीरे आयोजित करा आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

Ø रेशीम शेती वाढवण्यासाठी अभ्यासगट Ø बाजारपेठची माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची समिती Ø प्रगतीशील शेतीची माहिती प्रसारित करा Ø गावोगावी बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी वाढवावी Ø मधमाशी व शेततळ्यातून मत्स्यपालन वाढवण्याचे नियोजन करावे यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट (जिमाका) : कमी खर्चात चांगले उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून येथे रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या नियोजनासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) एक अभ्यास समिती स्थापन करावी व समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना रेशीम शेती सोबतच बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी, मधमाशी पालन व शेततळ्यातून मत्स्य उत्पादनाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आत्मा नियामक मंडळाची सभा आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक एस.यु.नेमाडे, नियामक मंडळाचे सदस्य प्रतिनिधी रेणुका शिंदे, प्रभाकर ठाकरे, जगदीश चव्हाण, रंजीत बोबडे, अशोक एकबोटे, रामभाऊ मार्शेटवार प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी बाजारपेठेत कोणत्या पिकांची मागणी आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पनन्‍ वाढीसाठी कोणती पिके घ्यावी, त्याची प्रतवारी कशी हवी, त्या पीकांची खरेदी कोठे होईल, उत्पन्नाचे मार्केटींक कसे करावे, पिकांना व्यापरी बाजारपेठ कुठे उपलब्ध होईल, याबाबत माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची समिती तयार करण्याच्याही सूचना बैठकीत दिल्या. प्रयोगशील शेतीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशकथा, शेतीतील नाविण्यपुर्ण प्रयोगाची माहितीच्या चित्रफीती तयार करून त्या सोशल मिडीया, युट्युब चॅलन, व्हाटॲप ग्रुप आदि माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचेही त्यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात संपुर्ण गावात बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्याचे तसेच मोठ्या प्रमाणात अवजार बँक तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेततळ्याद्वारे मत्स्य उत्पादन घेवून मत्सव्यवसाय वाढविण्यावर भर देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळची तूर दाळ प्रसिद्ध असून इतर जिल्ह्यात त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यवतमाळ दाळीची नावाने दुसऱ्या जिल्ह्यातील दाळ विक्री होऊ नये व ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी यवतमाळची तूर डाळ विक्री करतांना त्याच्या पॅकींगवर भौगोलिक संकेत (GI) प्रमाणीत करण्याची कार्यवाही करता येईल याबाबत आत्मा समितीने चाचपणी करण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत आत्मा नियामक मंडळाच्या सदस्याची विविध सूचना केल्या तसेच माहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी