2 लाख 33 हजार लाभार्थ्यांना अंगणवाडीचा घरपोच आहार

   


           
v गरोदर व स्तनदा माता तसेच बालकांना केले वाटप
यवतमाळ, दि.6 : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यासुध्दा बंद आहे. साहाजिकच अंगणवाडी केंद्रात गरोदर व स्तनदा माता तसेच बालकांना मिळणारा आहार बंद करण्यात आला. मात्र त्याऐवजी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घरपोच आहार पोहचविण्याची व्यवस्था शासनाने केली. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील 16 ग्रामीण / आदिवासी व एक नागरी प्रकल्पांतर्गत एकूण 2 लाख 33 हजार 852 लाभार्थ्यांना घरपोच आहार पोहचविण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 2847 ग्रामीण / आदिवासी अंगणवाडी केंद्र आणि 175 शहरी अंगणवाडी केंद्रातून 20 मार्च पासून 50 दिवसाचे कच्चे धान्य वाटप करण्यात आले आहे. गरोदर व स्तनदा मातांना तसेच सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या लाभार्थ्यांना जून 2020 पर्यंतचा घरपोच आहार पाकिटांच्या स्वरुपात वाटप करण्यात आला आहे. यात गरोदर व स्तनदा माता लाभार्थ्यांची संख्या 34621, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांची संख्या 92862 आणि तीन वर्षे ते सहा वर्षांपर्यंतचे लाभार्थी 106369 असे एकूण 2 लाख 33 हजार 852 लाभार्थ्यांचा समावेश आहे. गरोदर व स्तनदा मातांना 50 दिवसांकरीता एकदाच प्रति लाभार्थी चवळी (2000 ग्रॅम), मसूर डाळ (1900 ग्रॅम), गहू (3300 ग्रॅम), मिरची पावडर (200 ग्रॅम), हळद पावडर (200ग्रॅम), मीठ (400 ग्रॅम) आणि सोयाबीन तेल (500 ग्रॅम) पॅकिंग साईजमध्ये आहार देण्यात आला आहे. तसेच सहा महिने ते तीन वर्षे आणि तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठीसुध्दा जवळपास याच प्रमाणात 50 दिवसांचा आहार एकत्र दिला आहे.
अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत घरपोच पाकिट स्वरुपात हा सकस आहार देण्यात आला असून आहाराचे वाटप करतांना अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या नियमांचे पालन केले आहे. यात त्यांनी हातमोजे, सॅनिटायझर व मास्कचा वापर करून आहाराचे वाटप केले. एकही बालक आहारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तसेच स्थलांतरीत लाभार्थ्यांनासुध्दा आहार वाटप करण्यात आला आहे. तसेच अमृत आहाराची रक्कम प्रत्येक गरोदर माता, स्तनदा माता आणि सहा महिने ते सहा वर्षे बालकांच्या आईच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असे जि.प. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी कळविले आहे.
घरपोच पोषण आहाराबाबत बोलतांना झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यातील देमाडदेवीच्या लाभार्थी रंजना बाईने सांगितले की, अंगणवाडी सेविकांनी आम्हाला वेळेवर आहार दिला. अंगणवाडी सेविका चांगले काम करीत असून प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. आम्हाला अंगणवाडीतून घरपोच धान्य मिळाले. त्यामुळे हा आहार अडचणीच्या काळात खुप कामी आला. तर शिबला येथील लाभार्थी आशा मेश्राम म्हणाल्या, शेतीतील कामे बंद आहे, मजुरी नाही. अशा अडचणीच्या काळात अंगणवाडी सेविकेने धान्य घरपोच आणून दिले. आम्हाला खुप मदत झाली.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी