बरे होणा-यांची संख्या ‘फिप्टी’पार



v ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ मुळे प्रशासनाला दिलासा
यवतमाळ, दि.12 : दोन आठवड्यांपूर्वी यवतमाळच्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने सर्वच जण चिंताग्रस्त झाले. प्रत्येक दिवशी दुहेरी अंकात ही वाढ होत होती. मात्र प्रशासनाच्या उपाययोजना आणि डॉक्टरांचे अविरत प्रयत्न यामुळे गत चार दिवसांपासून त्याच झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेले सुरवातीचे दहा रुग्ण पकडून जिल्ह्यात बरे होणा-यांची संख्या अर्धशतकपार गेली आहे. आजपर्यंत तब्बल 53 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या नऊ जणांना मंगळवारी सुट्टी झाली. सुरवातीला  या नऊ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. मात्र 14 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे या नऊ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरवातीला 10 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. त्यांनतर गत चार दिवसांपासून बरे होणा-यांची संख्या 4,18,12 आणि आज (मंगळवारी) 9 अशी आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 53 रुग्ण बरे झाले आहेत.
गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 49 रिपोर्ट प्राप्त झाले. यात इंदिरा नगर येथील एका जणाचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हा पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आला होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 45 असून आयसोलेशन वॉर्डात एकूण 55 जण भरती आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 1580 आहे. यापैकी 1568 प्राप्त तर 12 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. तसेच उमरखेड येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या (लो रिस्क कॉन्टॅक्ट) 58 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 1293 जण असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी