कृषी निविष्ठा शेतक-यांच्या बांधावर पोहचविणे एक स्त्युत्य उपक्रम - पालकमंत्री संजय राठोड


                 
v 36 गावांमध्ये 78 मे.टन कृषी निविष्ठा रवाना
यवतमाळ, दि.10 : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळणे याला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतक-यांसाठी महत्वाचा असलेल्या खरीप हंगामात शेतक-यांची कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात कृषी केंद्रावर येऊन ही खरेदी केल्यास गर्दी होईल व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होणार नाही. त्यामुळे कृषी विभागाने पुढकार घेऊन शेतक-यांच्या थेट बांध्यावरच या निविष्ठा पोहचविण्याचे नियोजन केले आहे. कृषी विभागाने शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय स्त्युत्य उपक्रम राबविला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतक-यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहचविणा-या वाहनांना हिरवी झेंडी दाखवितांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
संचारबंदीच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, शेतकऱ्यांना सर्व कृषी निविष्ठा थेट शेताच्या बांध्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. विकासाचा मुख्य केंद्र बिंदु शेतकरी असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकरी हिताचे निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे. शेतक-यांच्या बांधावर खते व बियाणे पोहचविण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले.  
यावेळी 37 वाहनांमधून 78.35 50 मे.टन कृषी निविष्ठा रवाना करण्यात आल्या. त्याची एकूण किंमत जवळपास 16 लक्ष रुपये आहे. दोन वाहनांमध्ये बियाणे तर 35 वाहनांमध्ये खते 36 गावांकरीता पोहचविण्यात आले. यात युरीया, डीएपी, 10-26-26, 20-20-0-13 ही इफको, आयपीएल, कोरोमंडल कंपनीचे खते तर सोयाबीनच्या बियाणांचा समावेश होता. सदर कृषी निविष्ठा पिलखाना, मार्कंडा, माळम्हसोला, कारली, येरद, गांडा, पारवा, यावली, गव्हाळा, रातचांदणा, वरुड, बोथबोडन, बेचखेडा, लासिना, पहुर, धानोरा, भारी, दिघोरी, पार्डी नस्करी, गळव्हा, वडगाव कापरा, उर्मडा, कामनदेव, तलेगाव, टाकळी, चौधरा, जांब, चिचघाट, धामणी, हिवरी व कापरी येथे पोहचविण्यात आल्या.
यावेळी जि.प. कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, तालुका कृषी अधिकारी शांताराम धनोडे, प्रगतशील शेतकरी अरविंद भेंडे, पिंपळखेडे आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस