रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन


v पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांचे विशेष लक्ष

v बोगस नोंदणी आणि उत्पनापेक्षा जास्त विक्री आढळल्यास कारवाई

यवतमाळ, दि. 28 : शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, त्याच्या हातात दोन पैसे जास्त यावे, या उद्देशाने शासन हमी भावाप्रमाणे शेतक-यांकडून कापूस खरेदी करते. मात्र जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस घरातच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शेतक-यांकडील कापूस त्वरीत खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार आता रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस घरात आहे. यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच शेतक-यांना दिलासा देण्यासाठी घरात असलेला कापूस त्वरीत खरेदी करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनासह सहकार विभागाला दिले होते. यावर नियोजन करीत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सहकार विभाग, सीसीआय, कॉटन फेडरेशनच्या सर्व अधिका-यांची विशेष बैठक बोलावली. तसेच जिनिंग मालकांसोबतही चर्चा केली. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शेतक-यांचा कापूस पुढील दहा दिवसांत खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम युध्दस्तरावर हाती घेण्यात आले असून यावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे विशेष लक्ष राहणार आहे.

जिल्ह्यातील जवळपास 25148 शेतक-यांचा 7 लक्ष 54 हजार 400 क्विंटल कापूस खरेदी करायचा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 44 पैकी 30 जिनिंग सुरू आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी कडक धोरण अवलंबिल्यामुळे पुढील दोन दिवसात पाच जिनिंग सुरू होणार आहे. यात वणी येथील दोन, राळेगाव येथील दोन आणि एक पुसद येथील जिनिंगचा समावेश आहे. एका सर्व जिनिंगवर एका दिवसात किमान 80 गाड्या खरेदी करीता नेण्यात येणार आहे. बुधवारी एकाच दिवशी 23 852 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात सीसीआयच्या वतीने 611 शेतक-यांचा 13639 क्विंटल कापूस, कॉटन फेडरेशनतर्फे 402 शेतक-यांचा 10213 क्विंटल कापूस असा एकूण 1013 शेतक-यांकडून 23852 क्विंटल कापूस खरेदी केला.

दोन दिवसांत सुरू होणारे पाच जिनिंग पकडून 44 पैकी 35 जिनिंगवर कापूस खरेदी करण्यात येईल. प्रत्येक जिनिंगवर रोज किमान 80 गाड्या गेल्याच पाहिजे, यापेक्षा जास्त नेण्यास हरकत नाही, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी संबंधितांना दिले आहे. तसेच बोगस नोंदणी किंवा सातबाराच्या पे-यावर असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त कापूस विकला गेल्याचे निदर्शनास आल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. आंतरजिल्हा कापूस खरेदीला पुढील दहा दिवस बंद करण्यात आले असून इतर जिल्ह्यातील कापूस यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंगमध्ये खरेदी केला जाणार नाही. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कापसाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच उर्वरीत जे जिनिंग सुरू करण्यात आले नाही त्यांचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडीत करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले आहे.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी