कर्जमुक्ती योजनेच्या थकीत खातेदारांनाही मिळणार खरीपामध्ये कर्ज


v वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश

v यवतमाळ, बुलडाणा व अमरावतीसह महाराष्ट्रातील

अनेक जिल्ह्यातील शेतक-यांना होणार लाभ

यवतमाळ, दि. 25 : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतक-यांना त्यांचे कर्ज थकीत असले तरी चालू हंगामाकरीता पीक कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतक-यांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बाब असून वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक व आचारसंहितेमुळे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जवळपास 98 हजार शेतकरी चालू खरीप हंगामाकरीता थकबाकीदार झाले होते. त्यामुळे त्यांना खरीप हंगामात कर्ज वाटपाबाबत अडचण येत होती. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीमध्ये सदर शेतक-यांना चालू हंगामाकरीता पीक कर्ज देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन शासनाने त्याच दिवशी शासन निर्णय निर्गमीत केला.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र असणा-या परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांना थकबाकीदार म्हणून गृहीत धरू नये. तसेच त्यांना खरीप 2020 हंगामामध्ये नवीन पीक कर्ज देण्यात यावे, असे निर्देश बँकांना दिले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 98 हजार शेतक-यासह बुलडाणा, अमरावती व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.

तसेच 2015 पासून ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतक-यांचे थकीत कर्जाचे पुनर्गठन व चालू कर्जाचे रुपांतर करण्यात येऊन त्यांनासुध्दा नव्याने पीक कर्ज मिळणार आहे.  यानुसार यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांना 745 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतक-यांनी सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसेच बँकेच्या शाखेत जावून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. सर्व पात्र शेतक-यांना बँकामार्फत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्र्यांनी बँकांना सुचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त नियमित सभासदांनाही कर्जवाटप करण्यात येत आहे.

जिल्ह्याचे खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट 2182 कोटी रुपये आहे. आतापर्यंत 48528 शेतक-यांना 365 कोटींचे खरीप पीक कर्ज उपलब्ध करून दिले असून यवतमाळ जिल्हा पीक कर्जवाटपात राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. 30 जून अखेर किमान 90 टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली असल्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी