कोरोना संकटात आशा आणि अंगणवाडीसेविकेचे काम कौतुकास्पद – पालकमंत्री राठोड

यवतमाळ, दि.19 : जिल्ह्यात कोरोना संकटाचा सामना सर्व यंत्रणा अतिशय धडाडीने करीत आहे. गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरावर गेला. मात्र प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमाने ही रुग्ण संख्या सात वर आली आहे. यात संपूर्ण जिल्हास्तरावरील, तालुका स्तरावरील तसेच ग्रामीण स्तरावरील यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. विशेष म्हणजे या संकटाच्या काळात ग्रामस्तरावर कार्य करणा-या आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविकेचेसुध्दा काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट आल्यापासूनच ग्राम स्तरावरील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी धडपडत आहेत. आशा व अंगणवाडी सेविकांना गावातील प्रत्येक घराची माहिती असते. तसेच आरोग्याबाबातचा कोणताही सर्वे या दोघींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गावातील नागरिकसुध्दा आशा ताई व अंगणवाडी ताईंकडे आरोग्य दूत म्हणूनच बघत असतात. आरोग्य विषयक कोणतीही समस्या असली की यांना माहिती दिली जाते. कोरोनाच्या संकटात गावात आलेल्या नवीन लोकांवर लक्ष ठेवणे, त्याची आरोग्याची परिस्थिती जाणून घेणे, शासनाचे तसेच प्रशासनाच्या आदेशाबाबत गावक-यांना अवगत करणे, आरोग्याबाबत काही समस्या असल्या तर लगेच उपचाराबाबत मार्गदर्शन करणे, कोरोनाची लक्षणे आढळली की वरिष्ठांना याबाबत माहिती देणे आदी बाबी  आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

त्यामुळेच गावाची आरोग्याबाबतची माहिती वेळोवेळी या दोघींच्या माध्यमातून प्रशासनाला मिळत असते. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्यात नक्कीच या दोन कोरोना योध्दांचा अग्रक्रम आहे, असे गौरवास्पद उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका यांच्याबाबत काढले आहे. कोरोना संकट निवळल्यानंतर पालकमंत्र्यांकडून आशा व अंगणवाडी सेविकांचा सत्कारसुध्दा करण्यात येणार आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी