रमजान महिना व ईद होईपर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवा

v मुस्लीम समाज बांधवांतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन
यवतमाळ, दि.5 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. राज्यात व जिल्ह्यातही याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून होत आहे. त्यातच मुस्लीम समाजाचा अतिशय पवित्र असलेला रमजान महिना सुरू झाला असून काही दिवसांनी ईद हा महत्वाचा सण आहे. मात्र असे असले तरी यवतमाळातील पॉझेटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यवतमाळ शहरात रमजान महिना व ईद हा सण पूर्ण होईपर्यंत खरेदीची दुकाने बंद ठेवावी, अशा आशयाचे निवेदन मुस्लीम समाज बांधवांतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. 
ईद हा मुस्लीम समाज बांधवांचा अतिशय महत्वाचा सण आहे. यानिमित्ताने कपडे, बांगड्या, बुट व चप्पल, विविध वस्तु आदींची खरेदी मोठ्या प्रमाणात समाज बांधवांकडून केली जाते. मात्र सद्यस्थितीत कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री या संकटातून राज्याच्या जनतेला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. दुर्देवाने आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने काही ठिकाणी हॉटस्पॉट झोन तयार झाले आहे. रमजान महिना व ईद निमित्ताने यवतमाळ शहरामध्ये कापड दुकान, बुट चप्पल, शॉपिंग सेंटर, कॉस्मेटिक, बांगड्याची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास या दुकानात मुस्लिम समाज बांधवांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणार नाही. तसेच गर्दीत एखादा कोरोनाबाधीत रुग्ण असल्यास यवतमाळ शहरसुध्दा आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रमजान ईद पुढच्या वर्षी पुन्हा येईल, परंतु मानवी जीवन पुन्हा येणार नाही. म्हणून जनतेच्या व देशाच्या हितासाठी रमजान ईद होईपर्यंत यवतमाळ शहरातील वर नमुद केलेली दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी देऊ नये, अशा आशयाचे निवेदन सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी