जिल्ह्यात आता खतांसाठी तीन रॅक पॉईंट होणार



v राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची मागणी मान्य

यवतमाळ, दि.21 : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत खतांचा रॅक पॉईंट हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) येथे आहे. मात्र या ठिकाणवरून संपूर्ण जिल्ह्यात खत पोहचविणे अडचणीचे जाते. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यांना खतांचा पुरवठा करण्यासाठी चंद्रपूर आणि नांदेड येथे खतांचा रॅक पॉईंट द्यावा, अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मांडली. ही मागणी मान्य करण्यात आल्याने जिल्ह्यात आता खतांसाठी तीन रॅक पॉईंट होणार आहे.  

भौगोलिकदृष्ट्या यवतमाळ जिल्हा हा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून असून खरीप हंगामाला लगेच सुरूवात होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात खतांचा पुरवठा हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) येथील रॅक पॉईंटवरून करावा लागतो. धामणगाव येथून वणी व उमरखेडचे अंतर हे दीडशे किमीच्या वर आहे. वणी हा तालुका चंद्रपूर जिल्ह्याला तर उमरखेड हा तालुका नांदेड जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे वणी व उमरखेड या तालुक्यांसोबतच लगतच्या तालुक्यांकरीता खतांचा रॅक पॉईंट चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यात द्यावा, अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. यावर राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत त्वरीत दखल घेण्यात आली.  जिल्ह्यातील शेतक-यांसाठी हा मोठा दिलासा असून खतांचा पुरवठा आता वेळेत करणे शक्य होईल.

खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्याकरीता 1 लक्ष 66 हजार 469 मे.टन खतांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, महागाव आणि दिग्रस या तालुक्यांना धामणगाव येथून खतांची वाहतूक करणे दूर पडत असल्याने या तालुक्यांकरीता नांदेड येथे रॅकपॉईंट तसेच वणी, मारेगाव व झरीजामणी या तालुक्यांसाठी चंद्रपूर रॅकपॉईंटवरून खतसाठा मिळणे आवश्यक आहे.

मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीला पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसीद्वारे उपस्थिती दर्शविली. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जि.प.उपाध्यक्ष बाळा पाटील कामारकर, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी