नागरिकांनो, उपचार व विलगीकरणाला घाबरू नका - पालकमंत्री राठोड


v नागापूर कोरोनामृत प्रकरणी गावसमितीला जबाबदार पकडणार

यवतमाळ, दि. 30 : रेड झोनमधून येणा-या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात राहणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळताच त्यांनी त्वरीत शासकीय यंत्रणेशी संपर्क करावा. स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपचार आणि विलगीकरणाला नागरिकांनी अजिबात घाबरू नये, असे कळकळीचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

जिल्ह्यात सध्या इतर राज्यातून तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहे. यात रेड झोनमधून येणा-या नागरिकांचाही समावेश आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष देण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावस्तरीय समिती स्थापन केली आहे. यात ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, मंडळ अधिकारी आदींचा समावेश आहे. या समितीने विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर तसेच काही लक्षणे असलेल्या नागरिकांवर गांभिर्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आतापर्यंत अडीच महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. मात्र आज उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील कोरोनाबाधित महिला मृत झाल्याने जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित मृत्युची नोंद झाली आहे.

सदर महिला ही मुंबईवरून आली होती तसेच तीने इतरत्रसुध्दा उपचार केले, असे निदर्शनास आले आहे. गावसमितीने ही बाब तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. मात्र यात दुर्लक्ष झाले आहे. याप्रकरणी गावसमिती तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात यावा, असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

गावागावात ज्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, त्यांनी खोकला, ताप, सर्दी आदी लक्षणांची तपासणी करून प्रशासनाला कळवावे. नागरिकांनीसुध्दा जागृत राहून बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती द्यावी. जेणेकरून डॉक्टरांना उपचार करण्याची संधी मिळेल. डॉक्टरसुध्दा संबंधितांना पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह करण्यासाठी अतिशय शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

000000000


Comments

  1. आपण एक पाउल पुढे चालू

    मोठ्या शहरातून आलेल्या लोकांणा होम क्वारेंनटाईन करता मग शासनाला विनंती आहे की हे पण करा

    मोठ्या शहरातून आलेले लोक शिस्त पालन करत नाही, मग मला अस वाटते की शासनाने एक पाऊल पुढे जावे.

    होम क्वारेंनटाईन केलेल्या व्यक्तीच्या घराच्या बाहेर एक पेपर चीपकवण्यात यावा. त्यामध्ये त्या व्यक्ती चे नाव लीहले असावे आणि तो व्यक्ती कुठे फिरताना दिसला तर शासनाला या नंबर वर फोन करा असे असावे,
    आणि तो पेपर आजूबाजूच्या घरी पण देण्यात यावा, जेणे करून तो व्यक्ती फिरताना दिसला तर आजूबाजचे लोक शासनाला ती माहिती देईल
    होम क्वारेंनटाईन करणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे तशी ती त्या व्यक्ती आणि आजूबाजच्या लोकांची पण जबाबदारी आहे की तो व्यक्ती होम क्वारेंनटाईन रहावा

    यामुळे हे होईल की तो व्यक्ती कुठेही जाणार नाही,

    सद्या परिस्थिती पाहता मोठ्या शहरातून लहान शहराकडे लोकांचा कल खूप आहे आणि यास गाव, आणि छोटे शहराला संसर्ग होण्याचा धोका येऊ शकतो त्यामुळे जर अस केला तर काही प्रमाणात आपण हे टाळू शकतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी