कोरोनाविरुध्दच्या लढाईत एकजुटीने काम करा - पालकमंत्री राठोड




v जिल्हा परिषदेत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
यवतमाळ, दि.1 :  कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर पसरले आहे. आपल्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यातही याची लागण झाली आहे. यवतमाळ शहरात तर या आठवड्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासन-प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. तरीसुध्दा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
            जिल्हा परिषदेच्या सभागृहात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
कोरोनाविरुध्दच्या लढाईत शासन आणि प्रशासनाला सामाजिक संघटनांचेही सहकार्य मिळत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ही सर्वांची लढाई आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच ही लढाई जिंकता येईल. त्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे गरीब आणि गरजु नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्तिंनी, उद्योजकांनी, व्यावसायिकांनी व इतर नागरिकांनी समोर येऊन मदत करावी. ज्यांच्याजवळ शिधापत्रिका नाहीत, अशा लोकांसाठी धान्याच्या किट उपलब्ध करून द्याव्या. तसेच या संकटाच्या काळात प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तिंना 20- 25 दिवस पुरेल अशा जवळपास पाच हजार अन्नधान्य किटची व्यवस्था जि.प. शिक्षक कर्मचारी व खाजगी अनुदानित शिक्षक यांच्यावतीने करण्यात येईल. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकरीता पासेसची व्यवस्था करण्यात यावी. एका सामाजिक संघटनांच्या दोन ते पाच प्रतिनिधींना पासेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आठवडा बदलला की पासेसचा रंग बदलवावा. सामाजिक संघटनांना प्रशासनाच्यावतीने मदत कार्याकरीता निधी उभारण्यासाठी सहकार्य करावे. गरजू लोकांची सामाजिक संघटनांनी दिलेली यादी तपासून सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना एकत्र येऊन सर्व गरीबांना मदत करतील. आरोग्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशा भागात प्रथम प्राधान्याने सामाजिक संघटना आणि प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशा अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीला जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी