शेतक-यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करा - पालकमंत्री संजय राठोड

                                                   
v कृषी विभाग व निविष्ठा पुरवठाधारकांना सुचना
यवतमाळ, दि.9 : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय कृषी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे कृषी निविष्ठा पुरवठाधारकांनी / कंपन्यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेतक-यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या पदाधिका-यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बनगीरवार, सचिव रमेश बुच, प्रदीप ओमनवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. शेतक-यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्ठा वेळेवर प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी खरीपाचे नियोजन करीत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता कुठेही गर्दी न होऊ देणे, याला शासन आणि प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा खरेदीकरीतासुध्दा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी गटांमार्फत सरळ शेतक-यांच्या बांधावर बी-बियाणे, खते, किटकनाशके व शेतीकरीता लागणारे आवश्यक साहित्य पोहचवावे. शेतक-यांनीसुध्दा शेतकरी गटांमार्फत बांधावरच एकत्रितरित्या हे साहित्य खरेदी करावे. यासाठी शेतक-यांना ज्या कृषी केंद्रातून साहित्य खरेदी करावयाचे आहे त्या दुकानाच्या नावासह खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे वाणनिहाय बियाणे, खते यांची मागणी शेतकरी गटांकडे करावी.  सोबतच शेतक-यांनी स्वत:चे नाव, पत्ता, शेत सर्वे क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक सुध्दा द्यावे.
मागणी असलेल्या निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यावर गटप्रमुखाने खते, बियाणे खरेदी करावे, जेणेकरून त्यांना कृषी केंद्रावर जावे लागणार नाही. ज्या विक्रेत्यांना शक्य आहे, त्यांनी शेतक-यांसाठी मोबाईल ॲप तयार करून त्यावर मागणी नोंदवावी. कोणत्याही निविष्ठांचा गटामार्फत पुरवठा करतांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सामाजिक अंतर ठेवावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी स्वत: आर.सी.एफ, इफको, कृभको, कोरोमंडल व इतर कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत फोनवर चर्चा करून यवतमाळ जिल्ह्यात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याबाबत सुचना दिल्या.
जिल्ह्यात खरीप हंगाम 2020-21 साठी 1.66 लक्ष मे. टन खतांचे आवंटन मंजूर असून यापैकी 31 हजार मे. टन खत उपलब्ध झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******* 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी