कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासनाला सहकार्य करा - पालकमंत्री संजय राठोड



               
v चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक
यवतमाळ, दि.5 : यवतमाळ शहरात पॉझेटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. मात्र या परिस्थितीत शासन आणि जिल्हा प्रशासन अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिकपणे काम करीत आहे. उद्योजक आणि व्यापा-यांच्याही काही समस्या आहेत. तरीसुध्दा प्रशासनाकडून जे काही करण्यात येत आहे, ते सर्व यवतमाळकरांच्या निरोगी आयुष्यासाठीच. त्यामुळे आणखी काही काळ सर्वांना ही कळ सोसावी लागेल. संकटाच्या या काळात सर्वांनी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी यवतमाळचे आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुण पोबारू, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया आदी उपस्थित होते.
सध्या आपण सर्व जण अतिशय कठीण प्रसंगातून जात आहोत, असे सांगून पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले, आर्थिक गाडा रुळावर आणायचा असेल तर जीवनावश्यक वस्तुंसोबतच इतर व्यवहार सुरू झाले पाहिजे. मात्र यवतमाळ सध्या रेड झोनमध्ये आहे. ही परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. सर्वांच्या सहकार्यानेच आपण ही लढाई जिंकून जिल्हा ग्रीन झोनमध्ये आणू शकतो. व्यापा-यांच्या अडचणी आहे. प्रशासनाची भुमिकाही सहकार्याची असून केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन परवानगी देईल.
तीन दिवस यवतमाळ शहर पूर्णपणे लॉकडाऊन होते. त्यानंतर दोन दिवसांसाठी मर्यादीत व्यवहार सुरू झाले तर नागरिकांनी खरेदीकरीता गर्दी केली.  त्यामुळे शहरात कुठेही गर्दी वाढू न देणे, ही प्रशासनाची पहिली प्राथमिकता आहे. शासन आणि प्रशासनाला ऐवढे दिवस सहकार्य केले आताही थोडे दिवस करा. जिल्ह्याच्या सुदैवाने व आपल्या प्रयत्नाने जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यु झाला नाही, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. आयसोलेशन वॉर्डात 500 बेडची व्यवस्था आहे. रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठीच सर्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात व्यापा-यांसह सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
आमदार मदन येरावार म्हणाले, जिल्ह्याचे प्रशासन आपल्यासाठी राबतेय. प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे रहा. तर जिल्हाधिकारी म्हणाले, कोव्हिड-19 चे लक्षणे दिसत नाही. त्यामुळे दुकानात येणा-यांना कसे ओळखणार. गर्दी झाली तर दुकानमालक तसेच इतरांनाही धोका होण्याची शक्यता आहे. संसर्गाची ही साखळी तोडायची आहे. दुकानदारांचे नुकसान होत आहे. मात्र सध्यातरी पर्याय नाही. यावेळी व्यापारी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील सर्व व्यापारी, उद्योजक प्रशासनासोबत आहे. शासन आणि प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन केले जाईल. प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करू, अशी ग्वाही देण्यात आली.
व्यापारी प्रतिनिधींच्या मागण्या : 1.शासनाच्या सुचनांचे पालन करून जीवनावश्यक वस्तुंसोबत इतरही दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी.2. एमआयडीसीमध्ये तीन पाळीत काम सुरू करण्यास परवानगी, 3. व्यापा-यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे समोरचे काही महिने व्यापा-यांकडून कर वसूल करू नये आदी मागण्या प्रतिनिधींनी केल्या.
 बैठकीला चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी राजेंद्र जैन, संजय अग्रवाल, राधाकृष्ण जाधवानी, महेश मुंदडा यांच्यासह इतरही संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी