अवैधरित्या कापूस विकणा-यांविरुध्द होणार कडक कारवाई - पालकमंत्री संजय राठोड



यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस युध्दस्तरावर खरेदी करण्याचे निर्देश सहकार विभाग, कॉटन फेडरेशन, सीसीआय आदींना देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोव्हिडनंतर नोंदणी झालेल्या शेतक-यांचा सर्वे करण्यात येत असून त्यांच्या घरात किती कापूस आहे, याची नोंद घेण्यात येत आहे. यात बोगस नोंदणी किंवा दुस-याचा कापूस स्वत:च्या नावावर दाखवून अवैधरित्या कापसाची विक्री करणा-यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे अजयकुमार व कापूस पणन महासंघाचे श्री. महाजन उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याला प्राधान्य असून इतर जिल्ह्यातून विक्रीकरीता येणा-या कापसाला जिल्हाबंदी करावी. तसेच आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या सर्व शेतक-यांची यादी सीसीआय व फेडरेशनकडून घेण्यात येईल. या आधारावर तहसीलदार, सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तिंवर तसेच व्यापा-यांसोबत संगनमत करणा-यांविरुध्द कडक कारवाई करावी. प्रसंगी गुन्हे दाखल करावे.

तसेच पुढील आठ ते दहा दिवसांत सर्व कापूस खरेदी करण्याचे उद्दीष्ट असल्यामुळे प्रति जिनिंग वाहन संख्या निश्चित करण्यात आली आहे. जिनिंगधारक कापूस खरेदी करण्याकरीता अडथळा निर्माण करीत असेल तर त्यांच्यावरसुध्दा कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी