यवतमाळ शहर वगळून मद्यविक्रीला अटी व शर्तीनुसार परवानगी

यवतमाळ, दि. 6 : लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या आदेशाने मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. आता मात्र यवतमाळ शहर वगळून शासनाच्या अटी व शर्तीनुसार मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या स्वाक्षरीने पारीत करण्यात आले आहे.
अनुज्ञप्तीची किरकोळ विक्री, अबकारी अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता जिल्ह्यातील एफएल-2/एफएलबिआर-2/सीएल-3 अनुज्ञप्तीचे व्यवहार (यवतमाळ नगर परिषद हद्द वगळून) पुढील आदेशापर्यंत अटींच्या अधीन राहून चालू करण्याची परवानगी देण्यात येत आहे. तसेच मद्याचे घाऊक / ठोक विक्रेत्या एफएल -1 व सीएल-2 अनुज्ञप्त्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्याची देण्याची परवानगी देण्यात येत आहे. यानुसार सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेतच व्यवहार सुरु ठेवता येईल.
एफएल-2/एफएलबिआर-2 तसेच सीएल -3 अनुज्ञप्तीसाठी सुचना : अनुज्ञप्तीमधून फक्त सिलबंद बाटलीतून मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. अनुज्ञप्तीसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नये व दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुट अंतर असणे अनिवार्य राहील. त्या करीता दुकानासमोर प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखून घ्यावीत. संबंधित अनुज्ञप्तीधारकाने नोकरांची व ग्राहकांची स्कँनिंग करावी व ज्या नोकरास, ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देवू नये. दुकान व सभोवतालचा परीसर दर दोन तासांनी निर्जुतकीकरण करणे आवश्यक राहील. तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅन्ड रब सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्तीधारकाची राहील.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे बंधनकारक राहतील. अनुज्ञप्तीमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मुनष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधितांची असेल. आपली अनुज्ञप्ती सिलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यरत राहील. मुंबई विदेश मद्य नियम 1953 च्या नियम 70 डी अन्वये विहित केलेली मद्य बाळगणे, खरेदी करणे याच्या क्षमतेच्या भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, कोणत्याही परीस्थितीत आपल्या आस्थापनामध्ये मद्य प्राशन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कडक  कारवाई करण्यात येईल.
उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपली अनुज्ञप्ती तात्काळ बंद करण्यात येईल व संबंधितांविरुध्द प्रचलित कायद्याअंतर्गत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील सिलबंद किरकोळ मद्यविक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलक लावणे बंधनकारक आहे. दुकानाकडून / ग्राहकांकडून नियमभंग झाल्यास त्यांच्याविरूध्द प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी