जिल्हाधिका-यांनी केली धानोरा येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी





यवतमाळ, दि.12 : उमरखेड तालुक्यातील मौजा धानोरा येथील एका व्यक्तिला कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्यामुळे त्याचा अहवाल पॉझेटिव्ह प्राप्त झाला आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने धानोरा गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या गावाच्या भागातील तीन किमी परिघीय क्षेत्राच्या सीमा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी धानोरा येथे भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, तहसीलदार रुपेश खंडारे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दादासाहेब ढगे, पोलिस निरीक्षक श्री. बोरचे, धानोराचे सरपंच प्रा. काळे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिक व गावाच्या आरोग्याच्यादृष्टीने पुढील 20 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून गावक-यांनी आपापल्या घरातच राहावे. विनाकारण बाहेर फिरु नये. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. तसेच अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा. शासन व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. आरोग्य विभागाने गावचा सर्वे अतिशय काळजीपूर्वक करावा. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
धानोरा गावात एकूण 447 घरे असून लोकसंख्या 2134 आहे. दोन वैद्यकीय अधिका-यांच्या निगराणीखाली रोज सकाळी 10 आरोग्य पथकाद्वारे गावचा सर्वे करण्यात येतो. यात कोणत्याही नागरिकाला लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरीत उमरखेड येथील कोव्हिड केअर सेंटरला पाठविण्यात येते.
यावेळी गावचे पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, आरोग्य अधिकारी, परिचारिका आणि गावातील स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी