यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू


v 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' सात जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात 12 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. तेव्हापासून ही संख्या 125 पर्यंत गेली. मात्र 12 मार्च ते 29 मे या कालावधीत जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. शनिवारी मात्र उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील पॉझेटिव्ह असलेल्या महिलेचा (वय 42) मृत्यु झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली आहे.

सदर महिला ही मुंबईवरून उमरखेड येथे आली होती. तिचे नमुने तपासणीकरीता पाठविले असता तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. या महिलेला गुरुवारी रात्री येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले होते. तिला श्वसनामध्ये त्रास होऊ लागल्यामुळे सुरवातीपासूनच डॉक्टरांचे तिच्या प्रकृतीवर अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे शनिवारी सकाळी तिचा मृत्यु झाला.

मुंबईवरून आलेला तसेच सुरवातीपासून संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. तर आयसोलेशन वॉर्डात पॉझेटिव्ह असलेले सात रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 106 पॉझेटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या आयसोलेशन वॉर्डात 18 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 19 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी तपासणीकरीता 11 नमुने पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2053 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 2044 प्राप्त तर नऊ रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1919 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 19 जण तर गृह विलगीकरणात 422 जण आहेत.

प्रशासनाचे आवाहन : जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्युची नोंद झाल्यामुळे सर्व नागरिकांनी अतिशय सतर्क राहावे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे करणे गरजेचे आहे. कोरोनासदृश्य काही लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर किंवा शासकीय आरोग्य संस्थेत जावून तपासणी करून घ्यावी. किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जेणेकरून बाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल व या विषाणुचा प्रादर्भाव रोखण्यास मदत होईल. याबाबत नागरिकांनी कोणताही निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी