खते व बियाणे थेट शेतक-यांच्या बांध्यावर

                     

                             
v दिग्रस येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
यवतमाळ, दि.10 : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. तसेच शासनाच्या सुचनेनुसार सामाजिक अंतर न पाळल्या गेल्यास कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व कृषी निविष्ठा थेट शेताच्या बांध्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दिग्रस येथे करण्यात आले. यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
विकासाचा मुख्य केंद्र बिंदु शेतकरी असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये करण्यात आला. त्याच धर्तीवर गावपातळीवर कृषी निविष्ठांचा पुरवठा करणे शक्य आहे. यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांनी समन्वयाने काम करावे. कृषी सेवा केंद्र ते शेतकरी गट यांचा समन्वय, वाहतूक व इतर कामाकरीता कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम पाहतील.
शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात असलेल्या तसेच 'आत्मा’ अंतर्गत नोंदणीकृत गटांकडे आपली नोंदणी करावी. यासाठी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/ गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक नोंदविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून खते, बियाणे खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी. या वाहतुकीकरीता आवश्यक असणारे परवाने कृषी विभागामार्फत उपलब्ध करुन द्यावे. संचारबंदी नियमावलीचे काटेकोर पालन करुन हा उपक्रम राबवावा. शेतकऱ्यांचा प्रतिसाद राहल्यास शेतकऱ्यांना कुठलीच अडचण भासू देणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी दिग्रस तालुक्याचा कोरोना संदर्भात आढावासुध्दा घेतला.
या उपक्रमाच्या एकत्रित खरेदीमुळे माल वाहतुक व हमालीचा खर्च वाचेल. तसेच कृषी केंद्रधारक मालाचा किफायतशीर भाव लावेल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व शेतकरी बचत गटाची विश्वासार्हता वाढेल आणि गट नव्याने सक्रिय होईल, असा विश्वास तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केला. यावेळी 50 मे.टन रासायनिक खत  250 बॅग सोयाबिन तसेच तुरीचे बियाणे  तालुक्यातील 15 गावामध्ये रवाना करण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्री. वझीरे, पुसदचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, जि.प. कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, दिग्रस तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी श्री. कलोसे, शेतकरी गटाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी