Ø पशुक्षेत्रात कार्यरत 135 जणांची शिबीरात रक्तचाचणी यवतमाळ, दि 6 जुलै (जिमाका) :- पशूंपासून मानवाला होणारे आजार टाळण्यासाठी पशुप्राण्यांच्या संपर्कात येतांना कोरोना प्रमाणेच मास्क, हॅण्डग्लोज, हॅण्डवाश इत्यादी सुरक्षीत साधनांचा वापर करावा तसेच नियमितपणे आपली शारिरिक व रक्त तपासणी करून काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत पशुसंवर्धन विभाग आणि श्री. रुख्मिणी पांडुरंग संस्थानच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड झोनोसिस डे’ निमित्ताने पशूजन्य आजार जनजागृती कार्यशाळा व रोगनिदान शिबीराचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे व सहयोगी अधिष्ठाता डॉ. आ. पा. सोमकुंवर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, पशवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र अलोणे, डॉ. भिमसिंग चव्हाण, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सामूहिक स्वास्थ्य विभाग प्रमुख डॉ. संदीप चौधरी तसेच नागपुरातील सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे, श्री. रुख्मिणी पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष डॉ दिनकर बडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की पशुजन्य आजाराची कारणे, त्यावरील उपाययोजना याबाबत आजच्या शिबीरात तज्ञाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. पशुधनाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी स्वत:च्या व सर्व पशुपक्षाच्या व पर्यायाने सर्व जनतेच्या सुरक्षेसाठी आजच्या शिबीरातील मार्गदर्शन गंभीर्यपुर्वक घेवून उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पशुजन्य आजारापासून समाज निरोगी ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असून त्याबाबत तज्ञांद्वारे जनजागृती करणेदेखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बोलतांना सांगितले की उपचारापेक्षा खबरदारी घेणे केव्हाही चांगले असून शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेतांना स्वत:च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये व आपली चाचणी करून खबदारी घेण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले यांनी कार्यशाळेची भुमिका व महत्व सांगितले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, डॉ. आ.पा. सोमकुंवर, डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. संदिप चौधरी, स्मिता मिरे, डॉ. दिनकर बडे यांनीदेखील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्राणिजन्य आजार आपल्याला कसे होतात, त्यावरीय उपाय, तसेच असे आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, मोकाट जनावरांच्या रेस्क्यू ऑपरेशन पासून तर शेल्टर मॅनेजमेंट पर्यंतच्या सेवाकार्यात पशुसेवकांची भूमिका, महत्व, सुरक्षा आदी विषयावर अनुभवी तज्ञाद्वारे शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत जिल्ह्यातील वन्यजीव तथा पशुकल्याण क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या संस्था संघटनांचा सत्कार करण्यात आला. यात कोब्रा ॲडव्हेंचर ॲण्ड नेचर क्लब, एम.एच.२९ हेल्पींग हॅण्डस्, बी. काईंड, ओलावा पशुप्रेमी, लिटील पॉज, एक हात मदतीचा, पगमार्ग, नेचर कन्झरवेशन, यवतमाळ प्लॉगर, युनिटी रेस्क्यु टीम यांचा समावेश होता. याप्रसंगी पशुक्षेत्रात कार्यरत 135 जणांनी पशुजन्य आजारासाठीची रक्तचाचणी करून घेतली. कार्यक्रमाचे संचालन पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.डी.रायबोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार आयोजन समन्वयक अश्विन सव्वालाखे यांनी व्यक्त केले. कार्यशाळा व शिबिरात, दिलीप चौधरी, दिनेश विडुळकर, अमोग व्होरा, अभिजीत गुल्हाणे, आशिष यादव, राहुल दाभाडकर, जिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, अन्नतंत्रज्ञान विद्यालय, जैवतंत्रज्ञान विद्यालय, प्राणिशास्त्र विभाग, वैद्यकीय व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी तसेच जिल्ह्यात वन्यजीव व पशुकल्याण क्षेत्रातील सेवाकर्ते व पशुसंवर्धन व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी