प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Ø कृषी दिन उत्साहात साजरा Ø राज्यस्तरावर विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार Ø कृषी विभागाच्या कृषी भवनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर यवतमाळ, दि १ जुलै जिमाका :- आपल्या जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून काढण्यासाठी आपल्याच जिल्ह्यात सफरचंद, रेशीम, फळबाग, फुलशेती, चण्याचे उच्चांकी उत्पादन, असे विविध प्रयोग करून समृद्ध होत असलेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा व माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. आज जिल्हा परिषद सभागृहात माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे , प्रशांत थोरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप कोल्हे, सिजेंटा कंपनीचे चिदम्बर फडणीस, तसेच प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. तत्पुर्वी जिल्हाधिकारी आणि मुख्या कर्यकारी अधिकारी यांनी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सिंजेटा कंपनीमार्फत सुरक्षित कीटकनाशके फवारणी यंत्र व रथाला हिरवी झेंडे दाखवून मार्गस्थ केले. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, वसंतराव नाईक यांच्यासारखे द्रष्टे नेते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे. त्यांचं आदर्शवत काम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरलेल आहे. आजचा दिवस आपल्या जिल्ह्यात सणासारखा साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याप्रति त्यांची आत्मियता आणि त्यांनी केलेलं काम निश्चितच प्रेरणादायी आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आपल्या जिल्ह्यत चांगले प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बँक आपण तयार केलेली आहे. या रिसोर्स बँकेचे यावर्षी आपण पोर्टल स्वरूपात रूपांतर करणार आहोत. या माध्यमातून जिल्ह्यात होणाऱ्या चांगल्या प्रयोगाची आणि शेतकऱ्यांची माहिती सर्व दूर पोहोचून जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा असे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळेल. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र कमी आहे हे वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. तसेच नवनविन तंत्रज्ञानासोबतच, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा. आत्मामार्फत फुड प्रोसेसिंग प्रकल्प राबविण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. फार्मर प्रोड्यूसर कंपन्यानी त्यासाठी एकत्र येऊन समृद्धपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. कृषि विभागासाठी कृषि भवनास मान्यता कृषीप्रधान जिल्ह्याचे महत्त्व ओळखून आज कृषि दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागासाठी नवीन कृषी भवनास मान्यता दिली. यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून दहा कोटी आठ लाख रुपयाची प्रशासकीय मंजुरी सुद्धा प्रदान करण्यात आली. जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची स्वतंत्र इमारत उभी राहत असल्याची बाब आनंददायी आहे. यावेळी बोलताना श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, वसंतराव नाईक हे दूरदृष्टीचे नेते आपल्या भारत देशात होऊन गेले आहेत, ज्यांनी कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविले. आजही पन्नास टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे आणि या शेतीतून निघणाऱ्या उत्पादनावर आपले जगणे अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति एकर उत्पादकता वाढविण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन श्री पांचाळ यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्ह्यातील राज्यस्तरावर विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात जगदीश चव्हाण, महेंद्र नैताम, प्रभाकर ठाकरे ,अरविंद भेंडे, अशोक वानखेडे ,दिलीप अलोणे, स्मिता ठाकरे, स्वाती शेंडे, रवींद्र पुंड, दिलीप वानखेडे, स्वाती रोहनकर, गणेश नेवारे, सोनाली जायले, अमोल चौधरी, राजेंद्र गावंडे, विनेश राठोड, विनोद सोळंके, गजानन भारती, दिनेश परटके, दिलीप दौन्ड ,प्रभाकर आवारी, किशोर जिरापुरे, विश्वनाथ मुकरे, या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सिंजेटा कंपनीच्या चिदंबर फडणीस यांनी सुरक्षित किटकनाशक फवारणी यंत्राची माहिती दिली. तर सुरेश राऊत यानी तर कैलास राऊत यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले तर आभार अमिता मात्र यांनी मानले. यावेळी शेतकरी आणि कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी