तंबाखू विरोधी पथकाद्वारे शासकीय रूग्णालय परिसरात धाड

55 नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय तथा रुग्णालय परिसरात 7 जुलै रोजी तंबाखू विरोधी आकस्मिक धाडसत्र राबविण्यात आले. सदर धाडसत्रामध्ये कोटपा कायदा 2003 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. यादरम्यान रुग्णालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या व सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला. कोटपा कायद्याअंतर्गत एकुण 55 लोकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली तसेच त्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समुपदेशन करण्यात आले. वरील धाडसत्र हे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात आले. आरोग्य विभागामार्फत सदर धाडसत्रामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत डॉ. मनाली बांगडे, मोहित पोहेकर, सागर परोपटे, अंजली रिठे, समुपदेशक ॲड. पुनम महात्मे, फराज सौदागर, सोनाली घायवान, किरण ठाकरे सहभागी होते. तसेच पोलीस विभागामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदिप परदेशी यांचे या विशेष सहकार्य लाभले असून सदर धाडसत्रामध्ये पोलीस विभागाचे सहायक फौजदार श्याम बोपचे, महिला पोलीस हवालदार अरुणा भोयर, पोलीस हवालदार मनोज चौधरी, वर्षा पाटील, पोलीस नाईक गोवर्धन वाढई इत्यादी सहभागी होते. ही मोहीम प्रभावीपणे राबविणे करिता अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ.सुरेंद्र भुयार, विभाग प्रमुख डॉ.खाकसे यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी