सैनिकांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित -जिल्हाधिकारी अमोल येडगे कारगिल विजय दिवस साजरा

यवतमाळ, दि 26 जुलै जिमाका :- सैनिकांच्या शौर्याचा दिवस म्हणून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. शहिद सैनिकांचे स्मरण करण्यासोबतच पुढील पिढीमध्ये देशभक्तीची, त्यागाची व शौर्याची भावना या माध्यमातून जागृत करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वतःच्या तारुण्याचा, कुटुंबाचा विचार न करता आपले जवान देशासाठी सीमेवर लढत असतात. त्यांच्यामुळे सामान्य माणसांना सुरक्षितपणे जीवन जगता येते. आपण प्रत्येक जण सीमेवर लढू शकत नाही, मात्र आपल्या सैनिकांसारखे काहीतरी चांगले काम निश्चितच करू शकतो, ते करण्यासाठी तरुणानी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कारगिल विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे तसेच सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेडगे उपस्थित होते. यावेळी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, अलकनंदा पुंजाजी सरोदे, सत्वशीला साहेबराव काळे, मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहिरे, स्नेहा विकास कुळमेथे, लक्ष्मीबाई यशवंत थोरात, या वीर पत्नी व मातांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कारगिल विजय दिवसाची शौर्यगाथा नवीन पिढीमध्ये रुजवण्यासाठी शाळा- महाविद्यालयामध्ये पुढील वर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. आपल्या जिल्ह्यातूनही सैन्य भरतीमध्ये टक्का वाढावा यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यातून बाराशे सैनिक देशाच्या सैन्यात सीमेवर आपले योगदान देत आहे. देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती शासन, प्रशासन कटिबद्ध असून माजी सैनिकांच्या कुटुंबीयांचे प्रश्न निकाली काढुन त्यांच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे म्हणाले, भारतीय सैन्याने कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य दाखवले ते अभिमानास्पद आहे. मात्र युद्ध म्हटले की हानी आलीच, या युद्धात 527 जवान शहीद झालेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवानांचा सुद्धा समावेश आहे. तीन वर्षापासून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम करताना या जवानांचे आयुष्य,त्यांचा संघर्ष, त्याग जवळुन पाहण्याची संधी मिळाली. त्यांच्या त्यागाचा सन्मान सामान्य नागरिकांनी करणे गरजेचे आहे. आपण नागरिक म्हणून त्यांच्यासाठी काम करण्याची, मदत करण्याची आपल्याला संधी मिळाली तर त्या संधीचे अवश्य सोनं करायला हवं असे उद्गार यावेळी व-हाडे यांनी काढले. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सैनिक,वीर माता, वीर पत्नीची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी