सतत पाऊसाच्या परिस्थितीत खरीप पिकांची घ्यावयाची काळजी

यवतमाळ दि.२७ जुलै जिमाका:- यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. सुर्यदर्शन सुध्दा झाले नाही. त्यामुळे खरीपातील पिके जसे की सोयाबीन, कापूस आणि तुर यांची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडत आहेत. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील पाण्याचा निचारा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन,कापूस आणि तुर पिकांमध्ये काही उपाय योजना करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र सांगवी यांनी दिला आहे. सोयाबीन पिकात करावयाचे व्यवस्थापन सध्या सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मुख्यत: चुनखडीयुक्त जमिनीत किंवा पांढरीच्या जमिनीत लागवड केलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे पिकाला सुर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली आहे आणि जमिनीत पाणी सचल्यामुळे पिकांना मुळाव्दारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम शेतामधून पाण्याचा निचारा लवकरात लवकर करावा.वापसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करावी,यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते तसेच काही प्रमाणात तण व्यवस्थापन ही होते.या व्यातिरीक्त सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड -२ची ५० मि.ली.प्रति १० लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. पहिल्या फवारणीने जर सोयाबीनची पाने हिरवी झाली नाहित तर पुन्हा आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. पावसामुळे वाणी किंवा पैसा या किडीचा नैसर्गिकरीत्या बंदोबस्त होतो, परंतु शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे वाढण्याची शक्यता आहे.अशावेळी अशा शंखी गोगलगाय गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगाय नाशक २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून घ्यावे.पाणी साचलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.सोयाबीनमध्ये खोडमाशी व उंट अळीचा प्रादुार्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस ५० टक्के २० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के २.५ मिली प्रति १० ली पाणी ची फवारणी करावी. कापूस पिकात करावयाचे व्यावस्थापन:- कापूस पिकामध्ये पाण्याचा योग्य निचारा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत.आकस्मिक मर किंवा मुळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सक्लोराइड २५ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून हे द्रावण झाडाच्या मुळाजवळ प्रति झाड १०० मिली घ्यावे.तसेच पीक ३० ते ४० दिवसाचे झाले असल्यास दोन टक्के युरायाची फवारणी करावी यासाठी २०० ग्रॅम युरीया प्रति १० लिटर पाणी असे प्रमाण वापरावे.पिकाची वाढ पुर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पिक ३० ते ३५ दिवसाचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा.त्यासाठी कोरडवाहू कपाशीकरीता ४० किलो तर बागायती कपाशीकरीता ५० किलो निमाकोटेड युरीया प्रति एकरी द्यावा.पाण्याचा निचरा झाल्यावरच खत द्यावे.कपाशीवर रसशोषण करण्याऱ्यां किडी विशेषत,मावा व तुडतुडे या किडीचा प्रार्दुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टीसिलीअम लिकॅनी ५० ग्रॅम किंवा ॲसीटामाप्रीड २० टक्के ४ ग्रॅम किंवा डायामिथोएट ३० टक्के २० मिली प्रति १० लि.पाण्याची फवराणी करावी. तुर पिकात करावयाचे व्यवस्थापन:- तुर हे पीक अति पाऊसास संवेदनशील आहे. म्हणूनच शेतातील साचून राहीलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.तुर पिकात फायटोप्थेरा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चारी बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेडेंझीम २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.तसेच जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड १०० मिली घ्यावे. ज्या ठिकाणी हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझीम ४ किलो प्रति एकर या प्रमाणे जमिनीतून द्यावे.अशा प्राकारे सतत आणि अति पावसाच्या परिस्थितीत खरीप पिकांची काळजी घेतल्यास पिकांचे रंक्षण करता येईल.असे आवाहन जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी