प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवुन द्यावा -जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ,दि 30, जिमाका :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वृद्धी करण्यासाठी सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार संच योजनेचा लाभ द्यावा अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात काल त्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेतला यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी यांत्रिकीकरण इत्यादी योजनांचा समावेश होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन संचासाठी अनुदान दिले जाते. अल्पभूधारक शेतकरी आणि बहुधारक शेतकऱ्यांसाठी योजनेचे अनुदान वेगवेगळे आहे. जिल्हयात सिंचनाचे प्रमाण बघता सिंचन वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि शेती समृद्ध करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. डेहणी उपसा सिंचन योजनेत १०० टक्के सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी तातडिने कामे मार्गी लावावित. पाणी वापर संस्थांची स्थापन करण्यासोबतच पाण्याचा जपून वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाकडून अनुदान दिले जाते. याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी सहायकांमार्फत या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्या. शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. ड्रोन द्वारे फवारणी करण्याची राज्यस्तरीय योजना लागू करण्यात आली आहे त्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. यासाठी शेतकरी, शेत्करी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. या योजनेची अंमलबजावणी आणि उपयोग तपासून पुढील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याची योजना तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकित दिल्यात. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक डॉक्टर एस यु नेमाडे जिल्हा दुग्धविकास अधिकारी डॉक्टर जया राऊत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ हॅप्पी गावंडे, सहाय्यक वैज्ञानिक एस एस मोटघरे, घ दि. तोटे, डॉ ए एस लाटकर, रेशिम विकास अधिकारी व्हि एस शिन्दे, प रा बरडे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी