पावसाळ्यात निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळा मान्सुन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे यंत्रणेला निर्देश

Ø आपत्ती हाताळण्यासाठी यंत्रणेने तत्पर राहावे Ø सर्व विभागांनी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करावी Ø नियंत्रण कक्षाचे नंबर व मार्गदर्शक सूचना प्रसारित करा Ø विजेपासून संरक्षणासाठी ‘दामिनी’ ॲपचा वापर करावा Ø पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांजवळ स्वच्छता ठेवा Ø रहदारीचे रस्ते व पुलांची दुरूस्ती तात्काळ करा Ø धोकादायक पुल, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा Ø दवाखान्यामधील अग्नीरोधक यंत्रणा अद्यावत करावी यवतमाळ, दि 5 जुलै (जिमाका) :- मान्सून कालावधीत नदी, नाल्यास पुर आल्यावर कोणीही रस्ता, किंवा पूल ओलाडंण्याचे धाडस करु नये, प्रशासकीय यंत्रणेने अशा ठिकाणी पाण्याची पातळी कमी होईपर्यंत वाहतूक होणार यासाठी बॅरीकेट्स लावून दक्षता घ्यावी. पुरातून गाडी टाकण्याचे अतिधाडस व निष्काळजीपणा यामुळे होणारी जीवीत हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपसी समन्वयातून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मान्सुनपुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. या आढावा बैठकीला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता मनिष राजभोज, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तन्वीर शेख, निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज तगलपल्लेवार, बांधकाम विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अभियंता प्रिती मस्के, तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालीकांचे मुख्याधिकारी, सिंचन मंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्सुन कालावधीत वीज पडणे, नदी नाल्यांना पूर येणे, साथीचे आजार, धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग इत्यादी विविध बाबींमुळ येणारी आपत्ती हाताळण्यास यंत्रणेने तत्पर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सर्व शासकिय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवणे, वरिष्ठ कार्यालयाच्या संपर्कात राहणे, मुख्यालयी राहणे, पूर्णवेळ दुरध्वनी सुरू ठेवणे तसेच कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठ प्रशासनास विनाविलंब माहिती देवून आपत्ती निवारणाची कार्यवाही विहित सुचनांनुसार करावी. आपत्तीमध्ये जीवित हानी टाळण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच आपत्ती नियंत्रण कक्षाचे अद्यावत दूरध्वनी क्रमांकाबाबत नागरिकांना माहिती द्यावी. पूरप्रवण क्षेत्र तसेच धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल पुर्वसूचना देण्यात यावी. अशा ठिकाणी तहसिलदार यांनी वैयक्तीक लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाचे संरक्षण भिंतींची डागडूजी अपूर्ण असल्यास ती तातडीने पुर्ण करावी. रहदारीच्या रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक पूल इत्यादींची माहिती संबंधीत तहसिलदार यांनी बांधकाम विभागाला कळवावी. बांधकाम विभागाने त्याची दुरूस्ती 24 तासात करावी किंवा पर्यायी आवश्यक उपाययोजना करावी. नगरपरिषदेने देखील रस्त्यावरील खड्डे मुरूम भरून तातडीने दुरूस्त करून घ्यावे. तसेच पावसाळ्यात कुठेही नाले तुंबणार नाही यासाठी नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी. पावसाळ्यात साथीचे आजार उत्पन्न होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी व त्यालगतच्या परिसराची स्वच्छता करावी. तसेच डासांच्या उत्पत्तीची ठिकाणी नष्ट करून डास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. विद्युत विभागाने तक्रार निवारण केंद्राचे दूरध्वनी क्रमांकाची माहिती नागरिकांना द्यावी तसेच वीज गेल्यावर ती परत सुरू होण्यास किती वेळ लागेल याबाबत नागरिकांना व्यवस्थीत माहिती द्यावी. विज पडून जिवित हानी होऊ नये यासाठी विजेची पुर्वसूचना देणाऱ्या ‘दामिनी’ ॲपचा वापर सर्वांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या सततच्या पावसामुळे होणारी हाणी टाळण्याकरिता गावात दवंडी देवुन दक्षता घेण्याबाबत नागरिकांना सुचीत करने, पाणी वाढल्यावर पोहायला जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवु नये, साथीच्या रोगापासुन संरक्षणासाठी उकळलेले पाणी प्यावे, अन्न पदार्थ झाकुन ठेवणे, पुरपरिस्थितीत पिण्याचे पाणी, सुके खाद्य पदार्थ यांचा योग्य साठा घरामध्ये करावा आदि मार्गदर्शक सूचना नागरिकांना देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले. धोकादायक पुल, इमारती, दवाखाण्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याचे तसेच जुण्या, जीर्ण व धोकादायक इमारती रिक्त करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच सर्व इमारतीत विशेषत: दवाखान्यामध्ये फायर ऑडिट करून अग्नीरोधक यंत्रणा अद्यावत करून घेण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मान्सुन कालावधीत येणाऱ्या आपत्तीत “काय करावे काय करू नये” याबाबत मार्गदर्शक सुचनांची माहिती https://sites.google.com/view/ddma-yavatmal/home या पोर्टल उपलब्ध आहे, त्याचा सर्वानी उपयोग करण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी