प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतीम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत

यवतमाळ, दि 8 जुलै जिमाका :- प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२२-२३ खरीप हंगामाकरीता लागू करणेबाबत शासनाने दि. १ जुलै २०२२ च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेले आहे. पीक विमा भरण्यासाठी आपण पेरणी केलेल्या पिकाची नोंद ७/१२ वर असणे आवश्यक आहे. ७ / १२ वरील पिकाची नोंद व आपण विमा भरलेले पीक एक असेल तरच भरलेला विमा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी यांनी ई-पिक पाहणी अॅप वापरुन आपण पेरणी केलेल्या पिकाची नोंद ७/१२ वर करुन घ्यावी. शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता पुढील प्रमाणे असून पीक विमा योजनेची अंतीम मुदत दिनांक ३१ जुलै २०२२ आहे. पीक विमासाठी शासनाने भारतीय कृषि विमा कं. लि. मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेन्ज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई ४०००२३, टोल फ्री क्र. १८०० ४१९ ५००४, ईमेल- pikvima@aicofindia.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. विमा हप्ता दर : पुढे पिकांचे नांव त्यापुढे विमा संरक्षित रक्कम व कंसात शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रति हेक्टर विमा हप्ता दर रुपयात दिले आहे. खरिप ज्वारी 28540 (570.8), सोयाबीन 46210 (924.20), मुग 25450 (509.00), उडीद 25450 (509.00), तुर 36802 (736.04), कापुस 46200 (2310.00) संरक्षणाच्या बाबी : विमा संरक्षणामध्ये पिक पेरणी पासुन काढणी पर्यन्तच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपुर्व / लावणीपुर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गीक आपत्ती या बाबींचा समावेश राहणार आहे. खरीप हंगाम सन 2022-23 पासुन योजनेत सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत, 7/12, पेरणीस्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन या हंगामापासुन गांवपातळीवर अधिकची सुविधा म्हणुन आपले सरकार सेवा केंद्राद्वारे म्हणजेच महा-ई-सेवा केंद्रावर सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पध्दत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी संबंधित बैंक, कृषि/महसुल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ५००४ या क्रमांकावर कळविण्यात यावी. तरी पीक विमा योजनेत सहभाग होऊन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी