299 रुपयांच्या हप्त्यात पोस्टाचा दहा लाखांचा विमा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि 21 जुलै जिमाका :- भारतीय डाक विभागाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करुन प्रति वर्ष 299 किंवा 399 च्या हप्त्यात विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले आहे. टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही नवीन योजना आणली आहे. ही योजना 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती.साठी आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी पोस्टमन घरोघरी जाऊन नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घेणार आहेत. यात विमाधारकाचा अपघाती मृत्यु, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल, शिवाय रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजारांपर्यंत दावा देखील करता येईल. त्याच बरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपया पर्यन्त खर्च देखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यु झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार व विम्याअंतर्गत किमान दोन मूलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम मिळणार आहे. 299 व 399 हप्ता योजनेतील फरक : या दोन्ही योजना सारख्याच पण 399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखांपर्यंतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसांपर्यंत प्रतिदिवस 1 हजार रुपये मिळतात. वाहतूक खर्च 25 हजार व मृत्यूनंतर 5 हजार अत्यसंस्कारासाठी मिळतात. मात्र 299 च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च लागू नाही. यांना ही योजना लागू नाही : साहसी खेळामध्ये सहभाग आदी, लष्कर, नौदल, हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती, आरोग्यासंदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती आजार- अपंग मुळे अपघात. उपचार करणारे डॉक्टर स्वत: विमाधारक किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाचा जवळच असेल, आत्महत्या, इत्र, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात, बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान, खाण कामगार, बांधकाम कामगार, ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, विषारी, स्फोटक इतर गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसतांना रुग्णालयात घेतलेला उपचार. या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा असून वर्ष संपल्यानंतर जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात विमा नूतनीकरण करावे लागेल. या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल्यास इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर नव्याने खाते काढून योजनेचा लाभ घेऊ शकेल. ही योजना टाटा एआयजीने सुरु केली असून टपाल खात्याने त्यांच्याशी करार केला आहे. देशभरात लाखांवर विमाधारक जोडले गेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात विशेष मोहीम सुरु करण्यात आलेली आहे, तरी यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर केशव बावनकुळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी