शहरातील सायकल ट्रॅक रद्द करुन रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध करा नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आदेश

यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- यवतमाळ शहरातील मुख्य वाहतूकीचा रस्ता बसस्थानक चौकापासून ते पांढरकवडा रोडवर नगर परिषदेने तयार केलेल्या सायकल ट्रॅक रद्द करून पुर्वी प्रमाणे रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आज निर्गमित केले. सायकल ट्रॅकमुळे अडथळा व अपघात होण्याची शक्यतेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अहवाल मागविले होते. प्राप्त अभिप्रायानुसार सदर सायकल ट्रॅक हा रस्ता वाहतूकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचा आहे तसेच वाहतूक, गर्दी, अपघात इत्यादी बाबींचा विचार करता मुख्य मार्गावर तयार करणे योग्य आहे काय ह्याबाबत जिल्हा स्तरीय रस्ता सुरक्षा समिती ह्यांचे अभिप्राय घेऊन कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच सदर सायकल ट्रॅक हा सलग लांबीचा किंवा रस्ता वाहतूकीसाठी आवश्यक रुंदी सोडून केलेला नाही. सदर सायकल ट्रॅक हा सायकलस्वारांसाठी तसेच रस्त्यांवरील वाहनांसाठी असुरक्षित असल्याचे दिसते, सदरील ट्रॅक चा वापर हा सायकलस्वारांकडून होत असल्याचेही दिसून येत नाही. याउलट याचा उपयोग दुकानदारांकडून तसेच वाहने पार्कींग करिता होताना दिसत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सदर सायकल ट्रॅक रद्द करण्याचे आदेश दिले. यासोबतच मुख्य रस्त्याचा कोणताही भाग हा रस्त्यांवरील वाहनांच्या रहदारीचे प्रयोजन सोडून पार्किंग, दुकानांचे अतिक्रमण इत्यादी कारणासाठी वापरला जाणार नाही याबाबत पोलीस विभाग वाहतूक नियंत्रण शाखा व नगर पालीका प्रशासन यांनी समन्वयातून कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी