कार्यालय प्रमुखांनी अभ्यागतांना वेळ देवून त्यांच्या समस्या सोडवाव्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे

लोकशाही दिनात 107 तक्रारी प्राप्त Ø नागरिकांच्या तक्रारींचा वेळच्या वेळी निपटारा करून प्रशासकीय गतीमानता राखा यवतमाळ, दि 4 जुलै जिमाका :- आपल्या तक्रारी घेवून येणाऱ्या नागरिकांना कार्यालय प्रमुखांनी वेळ देवून त्यांच्या समस्या व तक्रारींचे समाधान करावे, जेणेकरून छोट्यामोठ्या बाबींसाठी त्यांना लोकशाही दिनांत तक्रार करण्याची गरज पडू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकशाही दिनात सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की कार्यालय प्रमुखांनी अभ्यागतांना वेळ न दिल्याने त्यांना त्यांच्या तक्रारी घेवून लोकशाही दिनात यावे लागते, विनाकारण असे होऊ नये याची सर्व कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी. सर्व कार्यालय प्रमुखांनी अभ्यागतांना भेटीची वेळ ठरवून द्यावी व आपल्या कार्यालयात अभ्यागत नोंदवही ठेवावी. प्रत्येक कार्यालयातील अभ्यागत नोंदवहीची तपासणी दुसऱ्या कार्यालय प्रमुखांकडून करवून घेतल्या जाईल व लोकशाही दिनातील तक्रारकर्ते अर्जदार संबंधीत कार्यालय प्रमुखांकडे पुर्वी का गेले नाही किंवा गेले असल्यास त्यांच्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली याबाबत संबंधीतांना विचारणा करण्यात येईल. तसेच एकाच कामासाठी अर्जदार वारंवार तक्रार करत असल्यास संबंधीत विभागाने तक्रार अर्जावर कार्यवाही केली नाही, असे समजून तक्रारीसाठी विभागप्रमुखांना जबाबदार ठरविण्यात येवून त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. सर्व कार्यालय प्रमुखांनी प्रशासकीय गतीमानता राखण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचा वेळच्या वेळी निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 107 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील लोकशाही दिनापुर्वी करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी