जिल्ह्यात 85 टक्के खरीप पीक कर्ज वाटप जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकांचे केले अभिनंदन

100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी पंधरा दिवसात अजून 300 कोटी वाटपाचे केले आवाहन Ø पीक कर्ज वाटपात यवतमाळ जिल्हा अग्रेसर Ø मागील वर्षातील आजच्या दिवसाच्या तुलनेत 347 कोटी जादा वाटप Ø मागील पाच वर्षात प्रथमच 85 टक्के उद्दिष्टपुर्ती Ø महामंडळांनी कर्ज वाटप प्रकरणे गांभीर्याने घेण्याच्या सूचना यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- चालु खरीप हंगामात आतापर्यंत 1632 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करून यवतमाळ जिल्ह्याने मागील पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमच 85 टक्के उद्दिष्टपुर्ती साध्य केली आहे. तसेच गत वर्षी 8 जुलै 2021 पेक्षा या वर्षी 8 जुलै 2022 रोजी 347 कोटी पीक कर्ज जादा वाटप करून चांगले काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकांचे अभिनंदन केले तसेच येत्या दोन आठवड्यात अजून 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करून 100 टक्के उद्दिष्टपुर्ती करण्याचेही आवाहन त्यांनी बँकांना केले. बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे काल घेण्यात आली. याप्रसंगी रिझर्व बँक नागपूरचे अग्रणी बँक प्रबंधक उमेश भन्साली, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे प्रामुख्याने उपस्थित होते. पीक कर्जासोबतच इतर गैरकृषी क्षेत्र तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजना व महामंडळाचे कर्ज प्रकरणात एक महिण्याच्या आत निर्णय घेवून प्रस्ताव मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लाभार्थी गरजवंत नागरिक आपल्याकडे मोठ्या आशेने येतात, बँकेत अनेकवेळा चकरा मारतात तरी त्यांना वेळेवर कर्ज मंजूर केल्यास कर्जाचा निधी त्यांच्या उपयोगी पडावा यासाठी बँकांनी लहान सहान अडचणीसाठी परत न पाठवता त्या गोष्टींची त्यांचेकडून पुर्तता करून घेण्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तांत्रिक युगात लाभार्थ्यांना चकरा मारायला लावण्यापेक्षा जास्तीत जास्त कामे मोबाईलवरून करून घेण्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाकडील कर्ज प्रकरणांचा आढावा घेतांना वर्षभरातील नगण्य कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून पुढील तीन महिण्यात कामकाजात सुधारणा न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी मुद्रा लोन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण व विविध शासकीय योजनांतर्गत कर्ज पुरवठ्याचा आढावा घेतला. जिल्ह्याला 2022-23 या वर्षात 1919 कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 171130 खातेदारांना 1632 कोटी 52 लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले असून ते उद्दिष्टाच्या 85 टक्के आहे. तर मागील वर्षी आजच्या तारखेत 149691 खातेदारांना 1273 कोटी (57.76 टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. मागील पाच वर्षातील खरीप पीक कर्ज वाटपाची एकूण टक्केवारी दिलेल्या उद्दिष्टाच्या अनुक्रमे 58 टक्के, 61 टक्के, 71 टक्के, 78 टक्के व 83 टक्के होती, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये यांनी दिली. सर्वाधिक पीक कर्ज वाटपामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक 689 कोटी 14 लाख, भारतीय स्टेट बँक 347 कोटी 68 लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 142 कोटी 51 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 109 कोटी 38 लाख, बँक ऑफ महाराष्ट्र 95 कोटी 93 लाख यांचा समावेश आहे. बैठकीला शासकीय यंत्रणेचे अधिकारी, सर्व बँकांचे प्रतिनिधी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी