सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 150 कोटी रुपये मंजूर
*ऑगस्टमध्ये बांधकाम सुरु होणार
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन
यवतमाळ दि. 5 : गोरगरीब व वंचित घटकांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने भरविण्यात येत असलेले महाआरोग्य शिबीर कमालीचे यशस्वी होत आहे. यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाने 150 कोटी रूपये मंजूर केले असून येत्या ऑगस्ट महिन्यापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात बळीराजा चेतना अभियान, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य भव्य महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जि.प.अध्यक्षा डॉ.आरतीताई फुफाटे, खासदार भावना गवळी, खासदार विकास महात्मे, आमदार मदन येरावार, आमदार मनोहर नाईक, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार बोदकुरवार, आमदार अशोक ऊईके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शिंगला, अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेङराठोड, जिल्हा शल्य चिकित्सक टि.जी.धोटे, सुभाष राय आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यवतमाळचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल 210 खाटाचे राहणार असून यामध्ये विविध आठ प्रकारच्या आरोग्य सेवा देणाऱ्या सुपर स्पेशालिटी उपलब्ध होतील. महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने हजारो रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न या शिबिरात करण्यात आला आहे. 20 हजार रुग्णांची नोंदणी झाली आहे. अजूनही रुग्ण येतच आहे. शेवटच्या रुग्णावरील उपचार होईपर्यंत शिबीर चालू राहणार आहे.
आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, रोगराई वाढली आहे. त्यावरील उपचाराचा खर्च वाढला आहे. पैसाअभावी लोक पुर्वी मृत्युमुखी पडायचे, आता तंत्रज्ञान वाढले आहे. खर्चही वाढला आहे. खर्चाची यादी पाहुन लोक मोठ्या विवंचनेत उपचार घेण्याचे टाळतात, असे सांगून ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त भागात उपचाराअभावी आत्महत्येत वाढ झाली व या भागातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी राजीव गांधी आरोग्यदायी जिवनदायी योजना लागू केली आहे. तीन, चार वर्षात्‍ 50 ते 60 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे. राज्यातील गरजू सर्व रुग्णांना लाभ मिळून देण्यासाठी महाआरोग्य शिबिरे ठिकठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागपूर, लातूर, सोलापूर येथे शिबिरे घेवून  हजारो रुग्णांना दिलासा दिला. बीड येथे सव्वा लाख रुग्ण तपासले. आजही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. वर्षात मुख्यमंत्री निधी व स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्यातून 180 कोटी रूपये खर्चून विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
एकही गरजू रुग्ण उपचाराअभावी राहणार नाही
अन्य राज्याच्या तुलनेत आपल्या राज्याची आरोग्य सेवा चांगली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराअभावी राहू नये, यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. गरजूंनी आपल्या भागातील आमदारांशी संपर्क साधावा. आतापर्यंत हजारो रुग्ण उपचारानंतर बरे झालेत. कितीही महागडे उपचार असले तरी ते आम्ही करू, असे सांगून डी.वाय. पाटील रुग्णालयात शंभरावर बालकांवर तज्ज्ञांमार्फत शस्त्रक्रीया करून त्यांना जीवदान दिले,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्वावलंबन मिशनचे उत्कृष्ट कार्य
            आत्महत्याग्रस्त भागात कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना धीर देवून स्वावलंबनाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत, असा गौरवपूर्व उल्लेख करून जिल्हाधिकार्यांच्या या युनिक ॲक्टीव्हिटीची दखल सर्वांनी घेतली आहे, असे सांगितले. विदर्भ मराठवाड्यातील 15 वर्षात प्रलंबित असलेले शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे 1 लाख वीज कनेक्शन व मुलभूत सुविधा पुरविले आहेत.
            शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आणली. विमा योजनेची व्याप्ती वाढविली. पूर्वी 15 वर्षात केवळ 17 लाख शेतकरी विमा घ्यायचे. या शासनात एकाच वर्षात 1 कोटी 13 लाख लोकांना विम्याचे कवच दिले. सरकार जनतेचे असले पाहिजे, अशा शासनाने  निर्णय घेतला आहे. संकटे भरपूर येत आहे. मागील वर्षी 24 हजार गावात तर यावर्षी 26 हजार गावात दुष्काळ जाहीर केला. समाधान शिबिरातून लाखो गरजूंना विविध दाखले देण्यासाठी उपलब्ध करून सरकार आपल्यासाठी धावून येत आहे.
            राज्यात 11 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला आहे. केंद्र शासनाची टीम पाहणीसाठी आली आहे. आतापर्यंत 4 हजार कोटी रूपये केंद्राकडून पहिला हप्प्ता प्राप्त झाला आहे. पुन्हा 3 हजार कोटी रूपये मदतीची मागणी केंद्राकडे केली आहे. राज्यात केंद्र शासनाचे दोन-तीन पथके येवून पाहणी करत आहे. 50 टक्केपेक्षा जास्त पाऊस पडूनही विशेष मदत म्हणून केंद्र शासन आपणास विशेष मदत करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटी रूपयाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. शेतकऱ्यांना एका वर्षात 10 हजार कोटी रूपयाची मदत देण्यात आली आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, गरीब यांना स्वावलंबी करून त्यांच्या जीवनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.
            जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, स्तन कॅन्सरच्या रुग्णात वाढ होत आहे. 10 वर्षाच्या आतील आतापर्यंत सुमारे 1800 मुकबधीर बालकांची नोंदणी झाली आहे. उपचारासाठी 100 कोटी रूपये खर्च येणार असून टाटा व केंद्राच्या मदतीतून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. एकही मुकबधीर मुलगा उपचाराअभावी राहणार नाही. चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत दुर्धर आजारावरील  रुग्णांच्या मदतीसाठी मदत करीत आहेत. समाजात दानशूर मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणे महत्वाचे आहे, असे सांगून कोणताही आजार असो, नजीकच्या लोकप्रतिनिधीशी भेटावे, असे त्यांनी आवाहन केले.
            पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, सुदृढ समाज निर्मितीसाठी महाआरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. सर्वच भागातून दुर्धर आजाराचे रुग्ण आले आहे. तपासणीनंतर पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी उपचार घेण्यात येतील. हे शिबीर आरोग्य सेवेसाठी दिशादर्शक ठरणार असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून शासन निर्णय घेत आहे असे सांगून शासनाने घेतलेल्या मागेल त्याला शेततळे पीकविमा, अन्नसुरक्षा योजना आदी योजनांची यावेळी माहिती देवून यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल सुरु करण्याची मागणी केली.
            यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आदींची समयोचित भाषणे झाली.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी