पावसाळ्यात उद्भवणारे आजाराबाबत सतर्क राहावे
*आरोग्य विभागाचे आवाहन
*रूग्णांवर योग्य उपचार करावे
यवतमाळ, दि. 24 : पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा हे जलजन्य आजार पसरत असल्याने याबाबत नागरीकांनी सतर्क राहावे, तसेच रूग्णांवर योग्य उपचार करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जलजन्य आजारावर वेळीच उपचार झाले नसल्यास ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. पावसाळ्यातील हे आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून प्यावे, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावरील अन्नपदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खावू नये. यासारखी दक्षता घेवून आपण या जलजन्य आजारापासून दूर राहू शकतो.
या आजाराची लक्षणे आणि त्यावरील प्राथमिक उपचार पुढीलप्रमाणे आहेत. व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जिवाणुमुळे कॉलरा होतो. यात प्रथमत: जुलाब सुरु होतात आणि त्यानंतर उलट्याही सुरु होतात. गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूमुळे होतो. यात उलट्या आणि जुलाब एकाच वेळी सुरु होतात. अतिसार हा आजार जिवाणु आणि विषाणुमुळे होतो यात प्रामुख्याने जुलाब होतात. यात रुग्णास ओआरएसचे पाणी पाजावे. ओआरएस उपलब्ध नसल्यास भाताची पेज, सरबत, ताक, डाळीचे पाणी इत्यादी भरपूर प्रमाणात द्यावे आणि रुग्णास नजिकच्या आरोग्य केंद्रात घेवून जावे.
रोग प्रतिबंध व नियंत्रणात जलजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी शुद्ध पाणी प्यावे. गावातील नळ योजनेचे पाईपलाईनची गळती असल्यास तसेच नळ योजनेचे नळ, हातपंप, विहिरीचा परिसर इत्यादीचे आसपास घाण, चिखल, अस्वच्छता आढळून आल्यास तसेच पिण्याचे पाण्याचे साठ्याचे ब्लिचिंग पावडर टाकून नियमित शुद्धीकरण होत नसल्यास त्याबाबत ग्रामपंचायतीचे निर्देशनास आणून द्यावे आणि तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. शक्य असल्यास उकळलेले पाणी थंड करून प्यावे. वैयक्तिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे, उघड्यावर शौचास बसू नये. शेतकरी, शेतमजूर यांनी शेतावर कामाला जातानी पिण्याचे पाणी घरूनच न्यावे. नाला, ओढा, तला‍व किंवा शेतातील विहिरीचे पाणी पिऊ नये याबाबत काळजी घेवून नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी