योग जीवनातील दैनंदिन क्रिया व्हावी
- जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
यवतमाळ, दि. 21 : प्रत्येकाच्या जीवनात योग हा महत्त्वाचा आहे. योगमुळे अनेक फायदे होत असून केवळ योग दिनापुरती मर्यादित न ठेवता नागरीकांनी त्यांच्या आयुष्यात योगला दैनंदिन क्रिया करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. आज बचत भवनात आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पतंजली, आर्ट ऑफ लिव्हींग, जनार्दनस्वामी योगाभ्यास मंडळ आणि शारिरीक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाभरात योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार मदन येरावार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राजेंद्र डांगे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, क्षितीज तायडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी गेल्या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस साजरा करण्यात येत आहे. युनोने मान्यता दिल्यानंतर 21 जून रोजी जिल्हाभरात योग दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यवतमाळ शहरात 27 केंद्रावर सुमारे पाच हजार नागरीक या उपक्रमात सहभागी झाले आहे. केवळ एक दिवसासाठी योगक्रिया न करता ही आपल्या जीवनशैलीचा एक भाग व्हावा. योगमुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत असून प्रत्येकाने याचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार मदन येरावार यांनी योगमुळे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. प्रामुख्याने प्रतिकात्मक शक्ती वाढून आजारांना बळी पडण्याचे प्रमाण योगामुळे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाच्या प्रयत्नामुळे युनोमधील जवळपास सर्वच देशांनी समर्थन दिल्यामुळे आज संपूर्ण जगभर योग दिवस साजरा होत आहे. अशा उपक्रमांमुळे येत्या काळात योगला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी दिपक सिंगला यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांनी दिपप्रज्ज्वलन करून योगदिनाचे उद्घाटन केले. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे हिमालयातील बिजांपासून तयार केलेले तुळशीचे रोपे देऊन स्वागत करण्यात आले. दिनेश राठोड यांनी सूत्रसंचालन केले. शंतनू शेटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे समन्वयक राजू पडगिलवार यांनी आभार मानले. 45 मिनिटांच्या योग अभ्यासानंतर योग प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांना पतंजलीच्या वतीने प्रसाद आणि पतंजलीचे विविध उत्पादन भेट देण्यात आली.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने येथील दक्षता सभागृहात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित होते. नंदूरकर महाविद्यालयातील जलतरण तलावात जलसाधना करून योग दिन साजरा करण्यात आला. सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतही योग दिवस साजरा करण्‍यात आला. यावेळी आर सेटीचे संचालक एस. बी. मिटकरी, विजय ढोक, आमिर मनलस चंद्रमनी पाटील यांच्यासह मोबाईल रिपेअरींचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यवतमाळमध्ये योग प्रशिक्षक म्हणून दिनेश राठोड, सुनंदा गवळी, माया चव्हाण, सुहास पुरी, किर्ती राऊत, संजय ईश्वरकर, डॉ. धनश्री माळवी, संजय चांभारे, सुधाकर कापसे, संजय जामणकर, विजय चाफले, रवि ढगे, शंशाक खांडेकर, अनंत पांडे, जितेंद्र सातपुते, महेश जोशी, मनिष गुडे, दामोदर ठाकरे, विद्या ब्राम्हणकर, प्राची नेवे, राजेंद्र कठाळे, चेतना सायंकार, अतुल पाटील, विजय गडपायले, वर्षा पडवे, डॉ. सुप्रिया यादगिरवार, रेखा दुआ, शितल चव्हाडे, ज्ञानेश्वर सुरजुसे, सुनिता गाढवे, कविता बोरकर, वंदना सांभारे, संजय दंडे, प्रा. दुर्गेश कुंटे, गजानन चौधरी, पियुष भुरचंडी, फ्लोरा सिंग, पराग नेरकर यांनी कामगिरी बजावली

00000








Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी