बँकांतील एजंटांना चाप लावणार
-पालकमंत्री संजय राठोड
                             *गतीने कर्ज वाटप करावे
*विम्याचे पैसे परत करणार
*कर्जच्या मंजुरीपत्राचे वाटप
यवतमाळ, दि. 24 : शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी अनेक अटी शिथील करण्यात आल्या आहेत. असे असतानाही बँकांमध्ये कर्ज काढून देण्यासाठी शेतकरी एजंटांची मदत घेत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडूनच येत आहेत, ही बाब चिंताजनक असून बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून या एजंटांना चाप लावण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज दारव्हा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आयोजित पिककर्ज आढावा सभेत ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, महसूल उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार प्रकाश राऊत आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड म्‍हणाले, शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज मिळणे आवश्यक आहे. बँकांनी पिककर्ज उशिरा दिल्यास पैशाअभावी शेतकरी सावकरांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. बँकांच्या कर्ज वाटप करण्याच्या दिरंगाईमुळे शेतकरी पुन्हा एकदा सावकराच्या कचाट्यात सापडण्यास भाग पडणार आहे. त्यामुळे बँकांनी गतीने कामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. बँकांना मनुष्यबळ कमी पडल्यास महसूल यंत्रणेतील कर्मचारी देण्यात येतील. सद्या कर्ज पुनगर्ठणाची कामे प्राधान्याने घेऊन त्यानंतर पिक विमा योजनेची आलेली मदत शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करावी. हवामान आधारीत विमा आणि पिकविमा योजनेंतर्गत आलेल्या मदतीतून कर्जाची रक्कम परस्पर कपात करून नये, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांना नवीन कर्ज, मागील वर्षी कर्ज भरलेले शेतकरी आणि पुनर्गठणासाठी आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज काढून देण्यासाठी बँकांमध्ये एजंटांचा वावर वाढला असल्याची तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बँकांमधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून वारंवार बँकांमध्ये दिसणाऱ्या आणि बँकेच्या व्यवहारात व्यत्यय आणणाऱ्या एजंटांचा शोधून त्यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले.
बँकेच्या दारव्हा शाखेच्या वतीने 935 पुनर्गठणापैकी 570 शेतकऱ्यांना पाच कोटी 27 लाख रूपये, पुनर्रचनेच्या 299 पैकी 276 शेतकऱ्यांना दोन कोटी 35 लाख रूपये कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती दिली. येत्या काही दिवसात पुनर्गठणाचे कामे प्राधान्याने करण्यात येणार असून त्यानंतर पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी येत्या रविवारी, दि. 26 जून  रोजी बँकेचे व्यवहार सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 26 शेतकऱ्यांना पिककर्जाच्या मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी