पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणार
-         मुख्यमंत्री
·         किटा गावच्या शिवारातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी
·         किटा गावचे डोह निर्मितीसह गॅबीयन बंधारा जलसंधारणाचे आदर्श मॉडेल
·         किटा शिवारात कृषी विभागाचे 22 शेततळे,
·         दिलासा संस्थेचे 38 डोह व वर्ल्डव्हीजन संस्थेने निर्माण केले 22 गॅबीयन बंधारे
यवतमाळ दि. 5 : राज्यातील प्रत्येक गाव जल स्वयंपूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सातत्याने जलसंधारणाचे कामे होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शासन पाण्याच्या उपलब्धतेकरीता  जलसंधारणाच्या कामांवर विशेष भर देत आहे. शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करून देण्यासाठी येणाऱ्या पावसाळयात पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न शासन स्तरावर होणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यास पाणी पातळी वाढून शेतकरी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
  यवतमाळ तालुक्यातील किटा गावात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केलेल्या विविध जलसंधारण कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज केली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाहणीवेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री मदन येरावार,  संजीव रेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, डॉ. अशोक उईके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, कृषि विभागाचे सहसंचालक शू. रा सरदार, जिल्हा कृषी अधिक्षक डी. आय गायकवाड आदी उपस्थित होते.
 किटा गावच्या शिवारातील डोह निर्मितीसह गॅबीयन बंधाऱ्याची कामे ही जलसंधारणाचे आदर्श मॉडेल असल्याचे सांगत, मुख्यमंत्री म्हणाले, येथील नाल्यावर दोन किलोमीटर अंतरापर्यंत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी निश्चितच जमिनीत मुरणार आहे. त्यामुळे शिवारातील भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांना दोन ते तीन पीक घेता येणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे निश्चितच येथील बळीराजाचे उत्पादन वाढणार आहे. पर्यायाने उत्पन्नातही भर पडून शेतकरी स्वावलंबी होईल. जलयुक्त शिवार अभियानामुळे संपूर्ण राज्यात जलसंधारणांच्या कामांचा धडाका सुरू आहे. पाणी मुरविण्याच्या या मोहिमेत लोकांचा सहभागही स्पृहणीय आहे. असे चित्र सातत्याने राज्यात दिसत राहीले, तर लकवरच संपूर्ण राज्य जलसमृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ठिकाणी दिलासा संस्थेने केलेले डोह निर्मितीचे काम आदर्श आहे. संस्थांचा सहभाग जलसंधारणांच्या कामांमध्ये झाला, तर जलयुक्त शिवार हे राज्याला संपूर्ण दुष्काळमुक्तीकडे घेवून जाईल, यात शंकाच नाही.


जलसंधारण कामांची मुख्यमंत्र्याकडून पाहणी
किटा गावात कृषी विभागाच्यावतीने २२ शेततळी निर्माण करण्यात आली आहे. यापैकी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विलास शामराव टेकाम यांच्या शेततळ्याला भेट दिली व कामाची माहीती घेतली. श्री. टेकाम यांच्या शेतात 20 बाय 20 बाय 3 मीटर आकाराचे शेततळे निर्माण करण्यात आले आहे. या शेततळ्याची साठवण क्षमता 0.876 टीसीएम आहे. याच शिवारात दिलासा संस्थेच्या वतीने नाल्यावर सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत तीन मीटर खोली, १० ते २० मीटर रूंद व ५० ते १०० मीटर लाब बशीच्या आकाराचे एकूण ३८ डोह थोड्या-थोड्या अंतराने निर्माण केले आहे. तसेच या डोहाच्या पुढे वर्ल्डव्हीजन संस्थेने एकूण २२ गॅबीयन बंधारे बांधले आहेत. या गॅबीयन बंधारा व डोह यादरम्यान शेततळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे डोह जलसंधारणाचे मॉडेल किटा शिवारात विकसित करण्यात आले आहे. या सर्व कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केली.
00000




Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी