विशेष लेख
वृक्षलागवडीसाठी सरसावले हात
* स्वयंसेवी संस्था करणार उत्स्फूर्त वृक्षारोपण
* कुणी करणार श्रमदान, तर कुणी लावणार ट्री गार्ड
* वृक्षारोपणासाठी ग्रामस्तरावर जनजागृती
झपाट्याने होत असलेले नागरीकरण, औद्योगिकरण आदी कारणांमुळे वनाखालील क्षेत्र कमी होत आहे. राज्याच्या एकूण भूभागापैकी सध्या केवळ 20 टक्केच वनक्षेत्र उरलेले असताना हे प्रमाण 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यावर्षी दोन कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात वृत्रपत्रातून जनजागृती करण्यासोबतच चित्ररथ, गावोगावी ग्रामसभा घेऊन थेट नागरीकांनाच वृक्ष लागवड आणि संगोपणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. वन विभागाच्या या प्रयत्नांनी  नागरीकांमधूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्याचे वनाखालील प्रमाण पाहता तेही 20 टक्केच एवढेच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावगडीची मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन
येत्या 1 जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.या वृक्षारोपणात नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्यात पर्यावरणाला उपयोगी ठरणारी वृक्ष लागवड करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
वृक्षारोपणाची मोहिम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग गरजेचा आहे.खासगी जागेवर वृक्षारोपणासाठी रोपे पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.शहरामध्ये वृक्ष लागवड करताना पाच वर्षांच्या वर असलेली झाडे लावण्यात येणार आहे.त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.नागरीकांना रोपे मिळण्याची व्यवस्था वन आणि सामाजिक वनीकरण विभाग करणार आहे.पाच वर्षांवरील झाडे लावल्यास ती जगण्याची शक्यताही अधिक राहणार आहे.जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी नागरीकांना 50 टक्के सवलतीच्या दरात वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जिल्ह्यामधील वनाच्छादित क्षेत्र 20 टक्केच आहे.त्यामुळे हे प्रमाण 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी मोठा वाव आहे. संरक्षित क्षेत्र असलेल्या ठिकाणी वृक्ष लागवड केल्यास त्याचे संरक्षण होण्यास निश्चित मदत होईल. वन विभाग जिल्ह्यातील उजाड जागांवर तग धरू शकणारे वृक्ष लागवड करणार आहे.
मोहिम यशस्वीतेसाठी यंत्रणा कार्यान्वित
            वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी जनजागृतीसोबतच प्लॉनटेशन आयडी क्रमांक, गावाचे नाव, क्षेत्राचे नाव, वृक्ष लागवडीची आकडेवारी, लागवडीनंतर रिपोर्टींग आदी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल आहे. यवतमाळ विभागातील आठ वन परिक्षेत्रात सभा, दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. याला नागरीकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत असून जिल्ह्यात विक्रमी वृक्षारोपण होण्यासाठी यवतमाळ विभाग सरसावला आहे. यवतमाळ वन विभागात वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा प्रयत्नशील आहेत. यवतमाळ वन विभागातील आर्णी क्षेत्रात एक लाख, सावळी 40 हजार, जोडमोहा एक लाख दोन हजार, वडगाव-धानोरा 83 हजार, यवतमाळ 50 हजार, हिवरी 19 हजार, नेर 82 हजार, दारव्हा क्षेत्रात 70 हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
पालक सचिवांकडून आढावा
जिल्ह्याचे पालक सचिव व्ही.गिरीराज यांनी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला.वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.लागवडीसाठी झालेली रोपांची मागणी पूर्ण करावी, वृक्षांची टंचाई भासता कामा नये.निर्धारीत वृक्ष लागवडीच्या ठिकाणी वेळेत वृक्ष पोहोचविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
वेबसाईटवर रोपांची माहिती
संबंधित विभाग आणि सामाजिक संस्थांना नजिकच्या नर्सरीतून रोपे उपलब्ध करून दिले जातील. तसेच जिल्हाच्या yavatmal.nic.in या संकेतस्थळावरही तालुकानिहाय रोप वाटिकेमध्ये उपलब्ध असलेल्या रोपांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तालुका समन्वयकांची नियुक्ती
दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी वृक्ष लागवडीचे समन्वयन आणि मागणीप्रमाणे रोपे उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर तालुका समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी विविध विभाग तसेच सामाजिक संस्थांना वेळेत वृक्ष उपलब्ध करून देण्यासाठी हे अधिकारी समन्वय साधतील. या समन्वयकांशी संपर्क साधून रोपे उपलब्ध करून घेता येईल.
सिंदखेडवासी करणार श्रमदान
नेर वनपरिक्षेत्रातील सिंदखेडवासीयांनी वृक्षारोपण मोहिमेत श्रमदान करण्याचे जाहिर केले.उपस्थित नागरीकांनीच वृक्ष लागवडीची गरज यावेळी बोलून दाखविली.गावकऱ्यांना झाडाचे महत्त्व पटल्याने ते या वृक्ष लागवड मोहिमेत तन-मन-धनाने सहभागी होणार आहे.नेर बाजार समितीचे प्रा.शिवशंकर राठोड यांनी झाडाच्या रक्षणासाठी ट्रीगार्ड देण्याचे आश्वासन दिले.
वृक्षारोपणासाठी कार्यशाळा
वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वन अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे यांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी वनकर्मचारी आणि नागरीकांमध्ये जनजागृती करावी असे सांगितले.वृक्ष लागवडीबाबत लोकांमध्ये जागृतता निर्माण करण्यासोबतच या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले.
जनजागरण उपक्रमाला प्रतिसाद
वृक्षलागवडीसाठी वन विभाग आणि कोब्रा ॲडव्हेंचर ॲण्ड नेचर क्लबचे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत. याला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दारव्हा वनपरिक्षेत्राअंतर्गत घाटकिन्ही आणि जांभोरा येथे गावकऱ्यांना कोब्रा ॲडव्हेंचर क्लबचे मानद सचिव श्याम जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दारव्हा वनपरिक्षेत्राअंतर्गत 175 हेक्टर रोपवन क्षेत्रावर 70 हजार झाडे लावण्यात येणार आहे.या घाटकिन्ही, जांभोरा, नखेगाव, धामनगाव देव, देऊळगाव वळसा आदी रोपवनात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणार आहे. घाटकिन्ही व जांभोरा येथे नागरीकांनी या मोहिमेत सहकार्य देण्यचे आश्वासन दिले. जवळगाव आणि घुई येथील ग्रामसभेत नागरीकांनी मोहिमेत संपूर्ण सहकार्य करण्याचे असे आश्वासन दिले. आर्णी उत्तर आणि दक्षिण परिक्षेत्रातील पिंपळनेर, चांदणी, पांगरी, लोहणबेळ, वरूड ईजारा, कृष्णनगर या सात गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या आहे.प्रत्येक गावातील 60 नागरीकांची यादी श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे.दहेली येथील 200 नागरीकांनी 17 हजार वृक्षलागवडीचा संकल्प सोडला आहे.आर्णी तालुक्यातील केळझरा वरठी येथील गावकऱ्यांनी 1 हजार 500 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.उत्तर आर्णी भागातील पिंपळनेर, चांदणी आणि चांदापूर येथेजनजागरण मोहिम घेण्यात आली.गावातील मान्यवरांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी करण्याचे आश्वासन दिले.या मोहिमेत लोकसहभाग देण्याचे मान्य करीत झाडे तर लावूच पण ते जगवून दाखवू, असे आश्वासन दिले.वृक्ष लागवडीच्या प्रचारासाठी शिरपूर येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.यात नागरीकांनी 16 हजार 500 वृक्ष लागवडीचा संकल्प केला.सरंपच साहेबराव राठोड, हिरासिंग चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला.
सामाजिक संघटना, संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी आवाहन
हरीत महाराष्ट्रासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक संघटना आणि संस्थांनी पुढे यावे व वृक्ष लागवडीसाठी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी केले आहे.सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्ग, उद्योग जगतातील नागरिक यांनी या वृक्ष लागवड उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, तसेच झाडे लावायची असल्यास वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक यांनी केले आहे. वृक्ष लागवडीमुळे ओसाड जमिन भविष्यात हिरवागार दिसण्यास मदत होणार आहे.
उत्कृष्ट सेल्फीला मोफत व्याघ्र पर्यटन
        या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होणाऱ्या सामाजिक चळवळीतील संघटना, संस्था व नागरिकांनी झाड लावल्यानंतर त्यासोबतचा स्वत:चा फोटो वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे.यात सहभागी व्यक्तींची वनविभागातर्फे लकी ड्रॉद्वारे निवड होईल. यात पात्र ठरलेल्या व्यक्तींना व्याघ्र प्रकल्पात मोफत व्याघ्रपर्यटनाचा आनंद घेता येईल.
000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी