बँकांनी शेतकऱ्यांना सहयोगाची भूमिका घ्यावी
-पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. २७ : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरवात झाली आहे, याचा परिणाम म्हणून शेतकरी बँकांमध्ये जाऊन कर्ज घेण्यासाठी समोर येत आहे. त्यामुळे नवीन कर्ज, पुनर्गठणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज देण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहयोगाची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते आज बचत भवनात आयोजित पिककर्ज वाटपाबाबत आयोजित बँकांच्या जिल्हा समन्वयकांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी आमदार मनोहर नाईक, मदन येरावार, माणिकराव ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 732 कोटी रूपयांचे कर्ज 97 हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये बँकांनी त्यांच्याकडे असलेले पिक कर्जाबाबतचे प्रस्ताव प्राधान्याने पारीत करून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडण्यासाठी प्रक्रिया करावी. पिककर्ज वाटपाची स्थिती काही बँकांनी चांगल्या पद्धतीने केली असल्यामुळे आज 42 टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आहे. त्यामुळे येत्या काळात कर्ज वाटपात मागे असलेल्या बँकांनी पुढाकार घेऊन कर्ज वाटपाचा आकडा एक हजार कोटींच्या वर घेऊन जावा.
यावर्षी प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांनी आजपर्यंत कर्ज घेतलेले नाही, त्यांना कर्ज वाटप करावे. तसेच मागील वर्षी कर्जाची परतफेड केलेल्या सुमारे एक लाख शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्रांविना कर्ज वाटप करावे. कर्ज पुनर्गठण करताना केवळ एका साध्या अर्जावर ही प्रक्रिया करावी लागत असताना काही बँकांमध्ये अनावश्यक कागदपत्रे सादर करावी लागत आहे. त्यामुळे कर्ज वितरणामध्ये अडचणी निर्माण होत आहे. अशा किचकट प्रक्रिया राबविणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
गेल्या दोन वर्षांपासून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठण करण्यात आले आहे. यापूर्वीच्या थकीत कर्जाच्या पुनर्गठणाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम राखावा. शासन अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, यातून नक्कीच मार्ग निघणार असल्याची आशा पालकमंत्री यांनी व्यक्त केली.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी