वृक्षारोपणामध्ये उपयोगी ठरणारी झाडे लावावीत
-पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. २७ : राज्य शासनाने येत्या 1 जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या वृक्षारोपणात नागरीकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जिल्ह्यात पर्यावरणाला उपयोगी ठरणारी वृक्ष लागवड करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते आज बचत भवनात आयोजित वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुफाटे, आमदार मनोहर नाईक, मदन येरावार, माणिकराव ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, वृक्षारोपणाची मोहिम यशस्वी होण्यासाठी नागरीकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. नागरीकांना त्यांच्या खासगी जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी रोपे पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी. शहरामध्ये वृक्ष लागवड करताना पाच वर्षांच्या वर असलेली झाडे लावण्यात यावीत, यामुळे ट्रीगार्डची व्यवस्था करावी लागणार नाही, तसेच ही झाडे जगण्याची शक्यताही अधिक आहे. जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेली रोपे पुरेशी आहेत, नागरीकांना 50 टक्के सवलतीच्या दरात वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे रोपे उपलब्ध करून देण्यात येतील. ही रोपे केवळ लागवड करून सोडून द्यावयाची नसून त्याचे संरक्षण करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामधील वनाच्छादित क्षेत्र 20 टक्केच आहे. त्यामुळे हे प्रमाण 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी मोठा वाव आहे. लोकप्रतिनिधींनी नागरीकांना सोबत घेऊन संरक्षित क्षेत्र असलेल्या ठिकाणी वृक्ष लागवड केल्यास त्याचे संरक्षण होण्यास मदत मिळेल. जिल्ह्यातील उजाड जागांवर वन विभागाने त्याठिकाणी कोणते वृक्ष तग धरू शकतील, याची तपासणी करून वृक्ष लागवड करावी. नागरीकांना रोपे मिळण्याची व्यवस्था वन आणि सामाजिक वनीकरण विभागांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री यांनी नगर पालिका अध्यक्ष आणि स्वयंसेवी संस्थांना याबाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी