शिक्षणच सामाजिक समता प्रस्थापित करू शकते
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
                         *गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार                        
*मान्यवरांनी केले वृक्षारोपण
यवतमाळ, दि. 26 : राजर्षि शाहू महाराजांनी अठराव्या शतकातच आरक्षण आणि सामाजिक समता स्वत: अंगिकारून शेवटच्या घटकापर्यंत रूजविली. शिक्षणाचे मुल्य त्यांनी ओळखले होते. त्यांच्या पुढाकारामुळेच आज शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणच सामाजिक समता प्रस्थापित करू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. ते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती लता खांदवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, समाज कल्याण सहायक आयुक्त विजय साळवे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित केली. सर्व जाती-धर्माच्या नागरीकांनी त्यांनी समान अधिकार दिले. शिक्षणामुळे समाजात अमुलाग्र बदल होणार हे त्यांनी जाणल्यामुळे त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी वसतीगृहे निर्माण केली. विदेशात शिक्षण घेण्यासाठीही त्यांनी शिष्यवृत्ती दिली. एवढे उदारमतवादी धोरण शिक्षणाबाबत त्यांनी स्विकारले होते. शिक्षण, आरक्षण, मागासवर्गीयांचे कल्याण आदीमधून त्यांनी समाजाचे उत्थान केले. शाहू महाराजांनी केलेल्या प्रत्येक कृतीतून समाजाला एक नवी दिशा दिली.
आजही समाजाच्या विकासासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी मागे राहू नये. आर्थिक स्थिती विद्यार्थ्यांचा विकास साधण्यापासून रोखू शकत नाही. आजच्या युगात शिक्षण हेच विकासाचे माध्यम असल्याचे जाणून विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील ज्ञान अर्जित करावे, असे आवाहन श्री. सिंह यांनी यावेळी केले.
श्रीमती खांदवे यांनी विद्यार्थ्यांनी कोणतेही कार्य करीत असताना जिद्द महत्त्वाची आहे. कोणत्याही क्षेत्रात गेल्यास केवळ जिद्दीच्या जोरावर त्या क्षेत्रात आपण सर्वोच्च ठिकाणी जाऊ शकतो, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंगला यांनी आज आरक्षण, आणि अधिकार हे शाहू महाराजांनी दिलेल्या दूरदृष्टीचा परिचय असल्याचे सांगितले. शाहू महाराजांच्या विचार नागरीकांनी कृतीमध्ये आणावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सिंग यांनी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून आपला विकास साधावा, तसेच चरित्र घडविण्यावर आजच्या पिढीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केले. श्री. वंजारी यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
समाज कल्याण अधिकारी मिना अंबाडकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रबोधी घायवाटे यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण विशेष अधिकारी पियुष चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्‍यवरांनी वृक्षारोपण केले. यावेळी दहावी आणि बारावीमधील 30 गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज गुणवंत पुरस्कारानी गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने निता रेडके हिने मनोगत व्यक्त केले.
सकाळी येरावार चौकातून सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी काढण्यात काढण्यात आली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. येरावार चौकातून निघालेली रॅली नेताजी मार्केट, दत्त चौक, बसस्थानक येथून निघून सामाजिक न्याय भवनात रॅलीचा समारोप करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शाहू महाराजांना अभिवादन
राजर्षि शाहू महाराजांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
000000





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी