खरीप हंगामात सर्व विभागाने शेतकऱ्यांसाठी
मिशन मोड मध्ये काम करावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*जिल्हा आढावा बैठक
यवतमाळ, दि. 5 : यंदाचे वर्ष चांगल्या मान्सूनचे आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी बँकांशी संवाद साधून शेतकऱ्यांना पिककर्ज मिळून देण्यासाठी मदत करावी. सर्व विभागांनीही या खरीप हंगामात मिशन मोड मध्ये काम करावे म्हणजे चांगल्या मान्सूनचा फायदा घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये यवतमाळ जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री संजय राठोड, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खा.भावना गवळी, आमदार सर्वश्री मदन येरावार, अशोक ऊईके, राजू तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान, शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी, कृषि पंपांना वीज वाटप आदी कामे समाधानकारक झाली आहेत, तरीही आपल्यापुढे इतर मोठी आव्हाने आहेत. यावर्षीचा मान्सून चांगला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावातील कामे वेळेत पूर्ण करावीत. या कामातील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामपातळीवरील अडचणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने सोडविण्यासाठी लक्ष द्यावे.

शेतकऱ्यांना येत्या खरीपात 80 टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करावे. शासन बँकांना सर्वतोपरी मदत करीत आहे. आपल्या जिल्ह्यातही लोकप्रतिनिधींनी बँकांशी संवाद साधून पीककर्ज मिळून देण्यात शेतकऱ्यांना मदत करावी म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात खेळते भांडवल राहिल.
जलयुक्त शिवार अभियानाची कामे गतिने पूर्ण करता यावी म्हणून कृषि सहाय्यकाची पदे भरण्यासंदर्भात अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यावर भर द्या असे सांगून सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
 पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्याचे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडले. समस्या निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
            कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पीककर्ज वाटपाचे 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. सुलभ पीककर्ज वाटप अभियान यशस्वी करण्यासाठी बँकांच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवा व संधीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. तसेच ग्रामपातळीवर सिड बँक तयार व्हावी, कृषि विस्तारीत सेवा वाढवाव्यात, कृषि सहाय्यकाची पदे भरण्याची अधिकार अधिक्षक कृषि अधिकारी यांनी द्यावी, अशी मागणी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी रोप देवून सर्व उपस्थितांची स्वागत केले. प्रास्ताविकात अन्न  सुरक्षा योजना, सामाजिक सुरक्षा योजना, रोजगार सुरक्षा, रोजगार, आरोग्य सुरक्षा, सिंचन क्षमतेचा विकास, आर्थिक सुरक्षितता, पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बळीराजा चेतना अभियानांतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी