हरू, हातोला येथील वन जमिनवरील
अतिक्रमणाबाबत प्रस्ताव सादर करावा
यवतमाळ, दि. 24 : दारव्हा तालुक्यात हरू आणि हातोला येथील गावालगत वन जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया वन विभागाने तातडीने हाती घ्यावी, यासाठी लागणारा प्रस्ताव वन विभागाने सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात हरू आणि हातोला येथील वन जमिनीवरील अतिक्रमणाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, महसूल उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार प्रकाश राऊत, नायब तहसीलदार श्री. चिंतकुंटलावार आणि हरू, हातोला येथील नागरीक आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, हरू येथे 58 आणि हातोला येथील वन जमिनीवरील 63 घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हरू येथे हे अतिक्रमण नियमित करण्याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गेली अनेक वर्षे येथील नागरीक ही जमिन नावावर होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वन विभागाची जमिन केवळ सार्वजनिक उपयोगाकरीताच देण्यात येते. मात्र ही जमिन नागरीकांना रहिवासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही जमिन ग्रामपचांयतीला हस्तांतरीत करून ती नागरीकांना देण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल. तसेच ही जमिन केवळ दोन एकर असल्यामुळे त्या जमिनीच्या बदल्यात इतर ठिकाणची जमिन देता येईल काय याचाही विचार करण्यात येईल. तसेच या जमिनीचे वनाचे आरक्षण रद्द करून ते बिगर वनाची जमिन करून घेण्यासंदर्भात वन विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
हातोला येथील जमिनीबाबत सर्व प्रक्रिया पार पडूनही ले-आऊट पाडण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरीकांना त्यांची जमिन नावावर झालेली नाही. जमिनीच्या सर्व्हे करण्यासाठी नागरीकांनी दिलेले पैसे तातडीने जमा करण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी यांनी पार पडून हे ले-आऊट पाडून जमिनीचे पट्टे वितरीत करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी