दोन वर्षात राज्यातील सर्व नगरपरिषदा हागणदारीमुक्त करणार
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·         बेंबळा पाणी पुरवठा योजना; जॅकवेल उभारणीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी
·         शहरे स्वच्छ झाली तरच राज्य स्वच्छ होईल
·         घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेला प्राधान्य द्या
·         पहिल्याच वर्षी ५० नगरपरिषद हागणदारीमुक्त
यवतमाळ, दि. : राज्यात सुरु करण्यात आलेल्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’च्या माध्यमातून सन २०१८ पर्यंत राज्यातील सर्व नगरपरिषदा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. यवतमाळ शहरातील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन झाले. शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करावेत. शहराला बेंबळा प्रकल्पामधून पाणी पुरवठा करण्यासाठीच्या योजनेला ‘अमृत’मधून मंजुरी देण्यात आली असून या योजनेच्या जॅकवेल उभारणीच्या कामासाठी तातडीने दोन कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेला उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यवतमाळ नगरपरिषदेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महसूल राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार भावनाताई गवळी, आमदार मदन येरावार, यवतमाळ नगर परिषदेचे अध्यक्ष सुभाष राय, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंघला, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आदी  उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियाना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ सुरु केले. याद्वारे पहिल्याच वर्षी राज्यातील ५० नगरपरिषदा हागणदारीमुक्त झाल्या असून २ ऑक्टोंबर २०१६ पर्यंत आणखी १०० नगरपरिषदा हागणदारीमुक्त होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  राज्यात ४८ टक्के नागरीकरण झाले असून त्यादृष्टीने शहरांचा विकास होणे आवश्यक आहे. शहरे स्वच्छ झाली तरच राज्य सुंदर बनेल, त्यामुळे नगरपरिषदेने शहराचा चेहरा-मोहरा प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वच्छ पाणी पुरवठा, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व घनकचरा व्यवस्थापनाला सर्व नगरपरिषदांनी  प्राधान्य द्यावे. या कामांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपरिषदेच्यावतीने त्यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मदन येरावार, नगराध्यक्ष सुभाष  राय यांनी मनोगत व्यक्त केले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी भूमिपूजन झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले,  नगरपरिषदेला राज्य शासनाकडून मिळालेल्या २६.५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून यामधून शहरातील विविध ठिकाणच्या २५० रस्त्यांचे काँक्रीटिंग, तलाव सौदार्यीकरण, आठवडा बाजार परिसर विकास व शहरातील विविध खुल्या मैदानात आधुनिक उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे.
यवतमाळच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही
यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीनंतर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने सुमारे २६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून शहरात होणारी सर्व विकास कामे चांगल्या दर्जाची व पारदर्शकपणे करावीत. प्रत्येक पैसा सत्कारणी लावा, भविष्यातही यवतमाळ शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी