पिककर्ज वाटपामधील दलालांबद्दल तक्रारी द्याव्यात
*किशोर तिवारी यांचे आवाहन
*दलाल असलेल्या बँकांवर कारवाई
यवतमाळ, दि. 29 : शेतीचा हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. ही बाब हेरून बँकांमध्ये दलाल सक्रिय झाले आहेत. पिककर्ज वाटपामध्ये हे दलाल मध्यस्थांची भूमिका निभावत असून त्यापोटी शेतकऱ्यांकडून काही टक्के रक्कम घेत आहेत, हे प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन मिशनकडे याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी केले आहे.
पिककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक जिल्हात आढावा बैठका व मेळावे एप्रिलपासुन सुरू केल्यानंतरही २७ जुनपर्यंत  मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केवळ ४०  टक्केच पिककर्ज वाटप केले आहे. यापूर्वी मे महिन्यातच सरकारने खरीप हंगाम २०१४ -१५ व २०१५-१६ चे संपुर्ण पिककर्जाचे पुनर्वसन करून पाच वार्षिक हप्ते करून व्याज सवलत दिली होती. या सर्व पात्र शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज देण्याचे आदेश सर्व बँकांना नाबार्डमार्फत रिझर्व्ह बँकेने २२ मे दिले होते. मात्र राष्ट्रीयकृत  बँकांनी आजपर्यंत केलेल्या पिककर्ज वाटपामध्ये फक्त ३० टक्के शेतकऱ्यांना या पुनर्वसनाचा सवलतीचा लाभ दिला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांचे वार्षिक हप्ते भरून कर्ज नावे-जुने केले आहे. मात्र पिककर्ज वाटपामध्ये मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात बॅंक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अडचणींचा फायदा घेत दलालामार्फत वसुली करून नव्याने पिककर्ज दिल्याच्या तक्रारी  समोर येत आहे. हा प्रकार राष्ट्रीयकृत  बँकांची प्रतिभा मलिन करणारा आहे. या सर्व दलालग्रस्त बँकांची यादी आणि अधिकाऱ्यांची नावे शेतकरी मिशन रिझर्व्ह बँकेला राज्य अग्रणी बँकेमार्फत सादर करणार आहे. सोबतच यासर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी दंडाधिकाऱ्यामार्फत करण्याच्या निर्णय वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन घेतला आहे. सर्व राष्ट्रीयकृत  बँकांपिडीत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी मिशनला द्याव्यात, असे आवाहन शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केले आहे.
पाटणबोरी बँकेची शेतकरी मारहाणीची गंभीर दखल
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील यावर्षीचा दुष्काळ व मागिल तीन वर्षांपासुन होत असलेली सततची नापिकी यामुळे त्रस्त झालेल्या पाटणबोरी येथील  शेतकरी गजानन राजुलवार या शेतकऱ्याला बँक मॅनेजरने संगणकचा मॉनिटर मारण्यासाठी उचलण्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली आहे. या बँकेत दलालांमार्फत पिककर्ज देण्याचा सर्व मान्य नियमच सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी आल्या आहेत. २०१२ ते २०१४ मध्ये थकीत कर्ज असताना त्यांना नवे पिककर्ज दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र ज्यांनी दलालामार्फत न जाता सरळ संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहे. अशाच तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातुन दररोज येत असल्यामुळे यावर तातडीने उपाय करण्यासाठी शेतकरी मिशनने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन राज्य सरकार आणि शेतकरी मिशनला देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली.
सरकारच्या सूचनांची बँकाकडुन सतत पायमल्ली
एकीकडे सर्व बँक संघटना राज्य सरकार आणि शेतकऱ्यांकडून दबाब येत असल्याच्या तक्रारी राज्य अग्रीम बँकेला करीत आहे. मात्र त्यांचे अधिकारी रिझर्व्ह बँकेचे आदेश आणि राज्य सरकारच्या सूचनांची मागिल दोन महिन्यांपासून सतत पायमल्ली करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. पेरणी पुर्ण झाली तरी ६० टक्के पिककर्ज वाटप केले नसलेल्या आणि शेतकऱ्याला मारणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बँका संपावर जाण्याच्या विचारात आहेत. संपाची भाषा बोलणाऱ्या सर्व बँक संघटना पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन पिककर्ज वाटप केलेल्या भ्रष्ट बँक अधिकाऱ्यांना बँकांनी नौकरीतून मुक्त करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवावा, असे आवाहन श्री. तिवारी यांनी केले आहे.
यावर्षी चांगल्या पावसाच्या हवामान खात्याचा अंदाजाचे तसेच दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवाराच्या १० हजार गावांत झालेल्या विक्रमी कामाचे सोने करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ एप्रिल रोजी राज्याची खरीप आढावा बैठक घेऊन कृषी संकटाला समाप्त करण्यासाठी पुरोगामी कृषी धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये दुष्काळ आणि नापिकीच्या संकटामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना नव्याने पत पुरवठा होण्यासाठी राज्यातील कमीतकमी ८० टक्के शेतकऱ्यांना ३१ मे पुर्वी पुनर्वसन करून नव्याने पिककर्ज  देण्याचे आवाहन सर्व बँकांना केले होते. मात्र राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ मे पुनर्वसनाची शेवटची तारीख आता ३१ जुलै करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त  १४ जिल्ह्यात आजपर्यंत  फक्त ४० टक्केच वाटप केले आहे.
राष्ट्रीयकृत  बँकांच्या असहकारावर वसंतराव नाईक शेतकरी मिशनच्या अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांच्या जीव घेण्या गंभीर प्रकाराची व मागील वर्षी  राष्ट्रीयकृत  बँकांना पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सचिवांना या शेतकरी विरोधी  राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणाची कल्पना द्यावी, शेतकऱ्यांची गंभीर असलेली स्थिती लक्षात घेऊन पिककर्ज वाटपाला गती देऊन शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर आता १५ जुले पर्यंत कर्ज वाटप पुर्ण करावी, अशी विनंती केली आहे.
राष्ट्रीयकृत बँकांचा असहकार आणि पिककर्ज वाटपाच्या पुनर्वसनाच्या बाबतीत होणारी झळ मागील वर्षापेक्षा वाढला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी पिककर्ज वाटपासाठी ३१ जुलैची वाट पाहिल्यास ५० टक्के क्षेत्रातही शेतकरी पेरणी करू शकणार नाही, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी बँकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी दामदुप्पट्टीने खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. शेतकरी आत्महत्यांना निमंत्रण देण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यात यावर्षीचा अभुतपूर्व दुष्काळ व मागिल तीन वर्षापासून होत असलेली सतत नापिकी यामुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांच्या दारावर जाणे, ही काळाची गरज असताना संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर बँकांच्या धोरणामुळे चिंता ओढवली खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी