जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
यवतमाळ, दि. २७ : शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळांतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. आज जुनोना, मारेगाव, आपटी येथील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी यांनी महसूल भवनात मनमोकळा संवाद साधला.
जुनोना, मारेगाव, आपटी येथील विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षक आणि पालकांसमवेत विविध बाबींवर चर्चा केली. सुरवातीला जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचा परिचय करून घेतला. तसेच त्यांच्या भविष्यातील शिक्षणाबाबत चर्चा केली. उपस्थित विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणाबाबत विचारले असता आपले शिक्षण सेंट्रल पब्लिक स्कूल येथे झाल्याचे सांगितले. आवडीचे पुस्तकाबाबत विद्यार्थ्यांनी विचारले असता त्यांनी आपणाला केवळ वाचनाचा छंद असून त्यासाठीच आपण सर्वाधिक खर्च करीत असतो. तसेच त्यांनी जगभरातील मान्यवरांनी लिहिलेली पुस्तके वाचली असल्याचे सांगितले. स्पर्धात्मक परिक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवेत येतांना मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाबद्दल त्यांनी नागरीकांमधील ऊर्जेला योग्य स्थान देण्यासाठी शासकीय सेवेत येण्याबाबतचे उत्तर दिल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना करीअरबाबत मार्गदर्शन करताना श्री. सिंह म्हणाले, शिक्षणामुळे अमुलाग्र बदल होतील. त्यामुळे कालानुरूप शिक्षणाच्या संधी देणे आवश्यक आहे. केवळ आर्थिक कारणामुळे विद्यार्थ्यांचा विकास खुंटता कामा नये. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांचा विकास होईल, असेच वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा हवी आहे, त्यांनी शाळेत अभ्यास करण्यासाठी कोणत्याही एका शिक्षकाने शाळेत थांबून त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करावी. यावेळी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने दुसऱ्या गावी शाळेत जाण्यासाठी बसची अपुऱ्या व्यवस्थेबाबतची माहिती दिली. शाळेत विज आणि पाण्याची व्यवस्था करावी, असेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लोकसहभागातून डिजीटल शाळा केलेल्यांना शाळेत सोलार यंत्रणा बसविण्यासाठी निधी देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी