महसूलच्या सर्चरिपोर्टवर शेतक-यांना पिक कर्ज दया
                                                                                      - किशोर तिवारी
पिककर्ज व पुनर्गठनाचा आढावा
          यवतमाळ, दि.24 : शासनाने शेतक-यांना पिक कर्ज मिळवितांना लागणारा मुद्रांक शुल्क माफ केला आहे असे असले तरी सर्चरिपोर्टसाठी शेतक-यांना पायपिट करावी लागते शिवाय आर्थिक भुर्दंडंही  सहन करावा लागतो. महसूल विभागाने दिलेला सर्चरिपोर्ट अधिक विश्वसनिय असल्याने वकीलाच्या सर्चरिपोर्टची वाट न पाहता बँकांनी महसूल विभागाच्या सर्चरिपोर्टवर शेतक-यांना पिक कर्ज दयावे तसेच महसूल विभागानेही असा सर्चरिपोर्ट शेतक-यांना तातडीने उपलब्ध करुन दयावा असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे श्री.तिवारी यांनी पिक कर्ज वाटप, पिक पुनर्गठन तसेच पिक कर्ज मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत देशपांडे, नाबार्डचे व्यवस्थापक प्रविण मेश्राम, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच शाखा अधिकारी उपस्थित होते.
            रिझर्व बँकेने पुनर्गठन मंजूर केले आहे.  शासनाचेही आदेश आहे असे असतांनाही अनेक बँका पुनर्गठन करुन कर्ज वाटप करत नसल्याचे निर्देशनास आले आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित बँक अधिका-यावर कार्यवाही प्रस्तावित केली जातील. दिनांक 19 जून रोजी अर्ज दया कर्ज घ्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. आता दिनांक 26 जून रोजीही जिल्हाभर राष्ट्रीयकृत बॅकांच्या शाखासमोर हा कर्ज मेळावा होत आहे. महसूल व संबंधित विभागाने बँकांना शेतक-यांच्या यादया उपलब्ध करुन दयाव्या. या दिवशी जिल्हयातील सर्व पात्र शेतक-यांना पिक कर्ज वाटप करावे असे निर्देशही श्री.तिवारी यांनी दिले. राष्टीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपात कुचराई करु नये असेही ते म्हणाले.
विदर्भ कोकणचे पिक कर्ज वाटप सुरु
        विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने जिल्हयातील शेतक-यांना पिक कर्ज वाटप केले जात आहे. तसेच पात्र शेतक-यांचे पुनर्गठनही करण्यात येत आहे. जिल्हयात या बँकेच्या 25 शाखा असून या शाखांना 200 गावे जोडून देण्यात आले आहेत. जी गांवे या बँकेच्या शाखेला जोडलेली असतील तेथील नवीन पिक कर्ज तसेच पुनर्गठनास पात्र असलेल्या शेतक-यांनी शाखेच्या ठिकाणी जावून पिक कर्ज प्राप्त करुन घ्यावे असे आवाहनही श्री.तिवारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी