महाआरोग्य शिबीर गोर-गरीबांच्या हिताचे
अनेकांनी व्यक्त केल्या बोलक्या प्रतिक्रिया
यवतमाळ, दि. 5 : यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य असे महाआरोग्य शिबीर शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. यासाठी जनजागृती व वातावरण निर्मिती करण्यात आली होती. आपल्याला मोफत सुविधा उपलब्ध होत आहे, आपल्या आरोग्याची तपासणी होणार आहे, या उत्सुकतेने संपूर्ण जिल्ह्यातून पुरूष, महिला व अबालवृद्ध आले होते. या शिबिराचे रितसर उद्‌घाटन सकाळी 11.15 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते, परंतु सकाळी सात वाजल्यापासूनच लोक यायला सुरवात झाली होती. प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. यवतमाळ शहराच्या बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर आले होते. आलेल्या लोकांची नोंदणी, व्यवस्थितपणे करण्यात येत होती. विविध आजारावरचे तज्ज्ञ आलेल्या लोकांची तपासणी करीत होते. तपासणीसाठी आलेल्या काही अबालवृद्धांची बोलकी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.
महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने देहदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात यवतमाळ येथील रामनगरातील सुनंदा गवळी यांनी देहदानाचा अर्ज त्याच‍ठिकाणी भरून दिला. आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षक असलेल्या श्रीमती गवळी यांनी गेल्या दहा वर्षात विविध समाज कार्यात योगदान दिले आहे. मृत्यूनंतर किमान दोन झाडांचे लाकडे जाळण्यापेक्षा वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त ठरावी म्हणून त्यांनी देहदान केल्याचे सांगितले. पर्यावरणबाबत जागरूक असणे प्रत्येकाने गरजेचे आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होणारच, परंतु मृत्यूनंतरही आपण आणखी काही वर्षे वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञान देत जगू, या भावनेतून देहदानाचा संकल्प केला आहे. गेल्या काही वर्षांपासून देहदानाअभावी वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना गैरसोय होत असल्याने देहदान करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राळेगाव तालुक्यातील लोहारा येथील दामोदर कोंडस्कर यांनी गावातील 20 नागरिकांना घेऊन महाआरोग्य शिबिर गाठले. ते स्वत: कॅल्शियमच्या कमतरतेने आजारी आहे. त्यांनी गावातील दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरीकांचा शोध घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य केले. तसेच स्वत:चे वाहन घेऊन स्वखर्चाने यवतमाळला आणले. सोबत आलेल्या गावातील 18 महिलांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. श्री. कोंडस्कर यांच्या प्रयत्नामुळेच आम्हाला नागपूर येथील डॉक्टरांकडून उपचार मिळाला असल्याचे सांगितले. शेतकरी असले तरी श्री. कोंडस्कर यांनी सामाजिक जाणिवेतून हे कार्य केले आहे. त्यांनी आणलेल्या रूग्णांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, वात, डोळ्यांचे रूग्ण होते.
यवतमाळ तालुक्यातील रूई येथील दादाराव शिंदे दम्याच्या आजाराने अनेक दिवसांपासून आजारी आहेत. शिबिरात चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आले. उभे राहता येत नसल्याने त्यांनी रांग सोडून एक तास प्रतिक्षा केली. रूग्णांची गर्दी कमी झाल्यावर उपचार करूनच परत जाईल, असे त्यांनी सांगितले. चांगले डॉक्टर आहेत, म्हणूनच याठिकाणी एवढी गर्दी झाली आहे. गावागावात झालेल्या प्रचारामुळे आपल्याला या शिबिराची माहिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सिया विनोद निखाडे ही अडेगाव येथील दोन वर्षांची मुलगी व्हॉल्व्ह मध्ये छिद्र असल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आली. तिच्या पालकांना डॉक्टरांनी तीन दिवसानंतर शासकीय रूग्णालयात येऊन उपचार करण्यासाठी सांगण्यात आले. नागपूर, अमरावती येथे सियाची तपासणी करण्यात आली आहे, परंतु आर्थिक विवंचनेतून उपचार करणे शक्य नसल्याने या शिबिरात आल्याचे सांगितले. येत्या काही दिवसात शिबिराच्या माध्यमातून मुलीवर चांगली उपचार होतील, अशी आशा तिच्या आईने व्यक्त केली.
गंभीर रूग्णाला तातडीची मदत
यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथील पवन खडसे या 23 वर्षीय युवकाला तपासणी दरम्यान हृदयविकाराचा धक्का आला. याठिकाणी असलेल्या रूग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकाने त्याला तात्काळ उपचार करीत शासकीय रूग्णालयात हलविले. शिबिराच्या स्थळी असलेल्या चोख व्यवस्थेबाबत याठिकाणी आलेले रूग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
वरील प्रतिक्रिया प्रातिनिधीक स्वरूपाच्या असून हजारो रूग्णांना याचा लाभ होत आहे. मा. मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खरोखरच सूचक अशीच आहे. शेतकरी आत्महत्येप्रमाणे आरोग्य हे देखील महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी महाआरोग्य शिबीर घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. हे या शिबिरात आलेल्या नागरीकांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी