किन्हीच्या शेतकऱ्याने साधली पपईतून आर्थिक समृद्धी
* सरासरी पाच लाखांचे उत्पादन
* किन्ही येथील शेतकऱ्याचा प्रयोग
*1 हेक्टरमध्ये पपईची लागवड
यवतमाळ, दि. 15 : पारंपरीक पिकांना बाजूला सात जिल्ह्यातील अनेक शेतकरी फळ पिकाकडे वळत आहेत. आर्णी तालुक्यातील किन्ही या गावातील राजेश वंडे या शेतकऱ्याने एक हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करून आर्थिक समृद्धी साधली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते दरवर्षी सरासरी पाच लाख रूपये निव्वळ नफा कमावित आहेत.
श्री. वंडे या शेतकऱ्याकडे 11 एकर शेती आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते पारंपरीक पद्धतीने शेती करीत होते. काही वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतातील काही क्षेत्रावर फळझाडांच्या लागवडीचा प्रयोग सुरू केला. परंतु यातून पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नव्हते. कृषि विभागाच्या कृषि विस्तार यंत्रणेंतर्गत कार्यरत असलेल्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाच्या सल्ल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच एक हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली. कृषि विभागाच्या सल्ल्याप्रमाणे पपईचे संगोपन केले आणि ही पपई त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी घेऊन आली.
ओलिताची सोय असल्याने दोन बाय दोन या अंतरावर एकूण 1 हजार 600 झाडांची लागवड केली. पाण्याचे चांगले व्यवस्थापन केल्याने पीक पूर्ण होईपर्यंत 35 ते 40 पाण्याच्या पाळ्या दिल्या. त्यानंतर पाणी बचतीसाठी ठिंबक सिंचन संच बसविले. यामुळे पाणी वापरात 40 टक्क्यांची बचत झाली. पपई झाडाच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घेत नियमित निंदणी, तसेच किड व रोगाचे नियोजन आणि नियंत्रण केल्याने पपई झाडाची जोमात वाढ झाली. पपई लागवडीच्या अगोदर खड्ड्यांमध्ये दहा किलो शेणखत मिसळून टाकल्याने झाडाच्या वाढीसाठी उपयोग झाला.
फळांची परीपूर्ण वाढ झाल्यानंतर बाजारपेठेच्या मागणीनुसार पपईची तोडणी करून विक्री केली. त्यांना एका झाडापासून साधारणत: 30 ते 40 फळे मिळाली. या एका झाडापासून मिळालेल्या पपईचे वचन 40 ते 50 किलो असे होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना चार लाख 80 हजार इतके उत्पन्न मिळाले. 40 हजार रूपये खर्च वजा जाता 4 लाख 40 हजार इतका निव्वळ नफा शिल्लक राहिला. गेल्या वर्षी सहा लाख 40 हजार रूपयांचे उत्पादन झाले होते. 30 हजार रूपये खर्च वजा जाता सहा लाख 10 हजार रूपये इतका नफा राहिला आहे. श्री. वंडे यांनी आपल्या शेतातच फार्म हाऊसची तयार केले आहे.
शेतकऱ्यांनी फळपिकांकडे वळावे : राजेश वंडे
गेल्या अनेक वर्षांपासून कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरीक पिकांची लागवड करीत होतो. काही प्रमाणात फळझाडांचा प्रयोग केला. परंतू पाहिजे तेवढे उत्पादन मिळत नव्हते. आत्मा कार्यालयाच्या मार्गदर्शनामुळे पपई पिकाची माहिती घेऊन या पिकाचे उत्पादन सुरू केले. पारंपरीक पिकांपेक्षा फळपिके अधिक उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळपिकांकडे वळणे आवश्यक आहे, असे शेतकरी राजेश वंडे यांनी सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी