दिग्रस शहराच्या विकासासाठी कटिबद्ध
-संजय राठोड
* दिग्रस येथे भवानी पुलाचे लोकार्पण
यवतमाळ, दि. 12 : दिग्रस शहराला विकासाच्या मार्गावर  नेण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहे. या शहराचे संपूर्ण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
दिग्रस येथे भवानी पुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार भावना गवळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शहराच्या विकासात भर घालणाऱ्या भवानी पुलाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे शहरवासियांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी निघाला आहे. दिग्रस शहराच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. वाहतुकीची कोंडी सुटावी म्हणून शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्याचे रूंदीकरण, वळणरस्ते, पुलाची उंची व रूंदी, पर्यटन विकास निधी अंतर्गत भवानी टेकडीचे सौदर्यीकरण, तसेच प्रशासकीय इमारत, आदिवासी मुलांचे वसतीगृह, शासकीय धान्य गोदाम, 33 व 11 केव्हीचे वीज केंद्र अशी कामे होत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शहराच्या मध्यवस्तीतील दिग्रसकर नागरीकांचे होणारी गैरसोय टाळण्यासाठी होलटेकपुरा येथील धावंडा नदीवरील पुल होणे आवश्यक होते. विदर्भ पाटबंधारे विकास मंडळामार्फत सदर पुल झाल्याने शहराच्या दोन भागांना जोडणारा आणि विकासाला गती देणारा हा पुल झाला आहे. जुना पुल फक्त पायी रहदारीसाठी उपयोगात यायचा, जुना पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाची मागणी, गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. स्थानिक नागरीकांची मागणी व पुलाची गरज लक्षात घेता विशेष बाब म्हणून पुल करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
विकास कामाकरीता शासन नेहमीच सामान्य माणसांच्या पाठिशी राहिला आहे. केंद्र व राज्य शासनाचा जास्तीत जास्त निधी स्थानिक विकासासाठी मिळविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळेच गेल्या काही वर्षात विकासाची अनेक कामे मार्गी लागली असल्याचे यावेळी बोलताना खा. गवळी यांनी सांगितले. सुरवातीस पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी फित कापून पुलाचे उद्घाटन केले. तसेच पुलाची पाहणीही केली.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी