शेती, शेतकरी विषयक सकारात्मक देखाव्‍यास पारितोषिक
*गणेशोत्‍सव, दुर्गोत्‍सव मंडळांनी सहभागी होण्‍याचे आवाहन
यवतमाळ, दि. 2 : अवघ्‍या काही दिवसांवर गणेशोत्‍सव, दुर्गोत्‍सव आला आहे. यामध्‍ये सार्वजनिक मंडळ आणि उत्‍सव समित्‍यांनी शेती आणि शेतकरीविषयक देखाव्‍यांची निर्मिती केल्‍यास उत्‍कृष्‍ठ देखाव्‍यास मंडळ आणि उत्‍सव समितीस बळीराजा चेतना अभियानातर्फे पारितोषिक प्रदान करण्‍यात येत आहे. या स्‍पर्धेत मंडळ, समित्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.
जिल्‍ह्यात गणेशोत्‍सव, दुर्गोत्‍सव संपूर्ण महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्‍यात येतो. प्रत्‍येक गावातील मंडळे ही शेतकऱ्यांची किंवा त्‍यांच्‍या पाल्‍यांची असल्‍याने या माध्‍यमातून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी या मंडळांची भूमिका महत्‍वाची ठरणार आहे. त्‍यामुळे बळीराजा चेतना अभियानामार्फत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती निर्माण करण्याकरीता, तसेच शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गणेशोत्‍सव आणि दुर्गोत्‍सव कार्यक्रमात शेती, शेतकरी विषयक सकारात्मक देखावे उभारण्यात येणार आहे. अशा गणेशोत्सव मंडळांच्या उत्कृष्‍ठ देखाव्यास बळीराजा चेतना अभियानातून पारितोषिक देण्‍यात येणार आहे. याचबरोबर सर्व मंडळ व उत्सव समितींना गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदतीचे आवाहन करणे, तसेच मडळांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी थेट शेतकऱ्यांकडून धान्य, भाजीपाला, कडधान्य खरेदी करण्याचे आवाहन मंडळांना करण्‍यात आले आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ आणि दुर्गोत्‍सव मंडळ यात सहभागी होऊ शकतील. गणेशोत्सवासाठी ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१६ तर नवरात्रोत्सवासाठी १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१६ या कालावधीसाठी ही स्‍पर्धा राहणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी संबंधित तहसिल कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे. देखाव्यांची तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी केली जाणार आहे. तीन उत्कृष्ट देखाव्यांची निवड करून प्रथम बक्षीस पाच हजार रूपये, द्वितीय तीन हजार, तर तृतीय दोन हजार रूपये देण्‍यात येणार आहे.
मंडळांनी देखाव्यामध्ये दर्शविणारा शेतकरी हा उच्च मनोबल व प्रसन्न चित्त असावा, तो नेटके कपडे परीधान केलेला असून चिंताग्रस्त नसावा, शेतात चांगले पिक बहरले, शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय, पत्नी किंवा कुटुंबिय शिवणकाम, दळणयंत्रे, छोटे दुकान असे पुरक व्‍यवसाय देखाव्यामधून निदर्शनास येणारे असावे, मुले उच्चविद्याविभूषित असल्याचे दाखवून ते मोठ्या पदावर कार्य करीत असल्याचे दाखवावे, घरामध्ये अन्नधान्याची मुबलकता असल्याचे दाखवावे, शेतकऱ्यांना प्रसन्नता वाटेल, तसेच त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल असे प्रवचन, किर्तन, पोवाडे, नाट्य इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्‍याचप्रमाणे इतरही सकारात्मक बाबी दर्शविणारे देखावे निर्माण करावे, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे.
यवतमाळ तहसिलदारांचे आवाहन
        बळीराजा चेतना अभियानांतर्गत या स्पर्धेत यवतमाळ तालुक्यातील मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यवतमाळचे तहसिलदार यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी