साडेतीन हजार शेततळे, फुलविणार मळे
* जिल्ह्यात 3443 शेतकऱ्यांना देणार शेततळे
*शेततळ्यांसाठी 3210 अर्ज प्राप्त
*जिल्ह्यात 165 शेततळ्यांची कामे पूर्ण
यवतमाळ, दि. 23 : शेतकऱ्यांची पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करून त्याच्या शेतामध्येच पाण्याची सोय करण्यासाठी शेततळ्यांची योजना राबविण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत असून त्याचा फायदा घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी समोर येत आहे. यावर्षी सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध होणार असून येत्या रब्बी हंगामात शेततळ्यांतील पाण्यावर शेतकऱ्यांचे मळे फुलणार आहे.
शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मागेल त्याला शेततळे हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने गेल्यावर्षीपासून सुरु केला आहे. शाश्वत आणि हक्काची सिंचन सुविधा देणा-या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 3443 शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मंजूर शेततळ्यांपैकी 2249 शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून आतापर्यंत 165 शेततळे पूर्ण झाले आहे.
सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहावे लागते. खरीपाच्या मुख्य हंगामातही पावसाने दगा दिल्यास ही पिकही हातचे जाते. हक्काची सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास खरीपासह अन्य पिकेही शेतक-यांना घेता येवू शकतो. तसेच रब्बी व उन्हाळी पिकेही घेतली जावू शकते. यासाठी सिंचन असणे फार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अनेक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासोबतच या माध्यमातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना दिनांक 17 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयान्वये सुरु केली होती.
जिल्ह्याला सन 2016-17 या योजनेच्या प्रथम वर्षाकरीता 3443 इतक्या शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचे होते. जिल्ह्यातील 2310 शेतकऱ्यांनी दि. 4 ऑगस्टपर्यंत शेततळ्यांसाठी अर्ज सादर केले आहे. अर्जाच्या छाननीनंतर 2598 अर्ज तांत्रिकदृष्ट्या तसेच जागा योग्य असल्याचे आढळून आले. तालुका समितीने लक्षांकानुसार 2503 अर्जांना मंजूरी दिली आहे.
शेततळ्यासाठी शासनाच्या वतीने कमाल 50 हजारापर्यंत अनुदान मंजूर केल्या जाते. समितीने मंजूर केलेल्या अर्जांपैकी 2249 अर्जदार शेतकऱ्यांच्या शेततळे खोदण्याच्या कामास प्रशासनाने कार्यारंभ आदेश दिले असून 165 शेततळे खोदून पूर्ण झाली आहे. जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकापैकी सर्व शेततळे याचवर्षी पूर्ण होणार आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची यापूर्वी सुविधा नव्हती, अशा शेतकऱ्यांना सहज शेततळे संजिवनी देणारी ठरणार आहे. शिवाय एकापेक्षा जास्त पिके शेतकरी शेततळयातील पाण्याच्या भरवशावर घेणार असल्याने त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासोबतच जिवनमान उंचावण्यासही मोलाचे ठरणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी